न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांत हिंदुस्थानी संघातील स्टार खेळाडूंच्या खराब कामगिरीनंतर जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. विराट कोहली व ऋषभ पंत हे स्टार फलंदाज टॉप-10मधून बाहेर फेकले गेले आहेत. यशस्वी जैसवालने चौथ्या स्थानावरून तिसऱया स्थानी झेप घेतली, हीच काय हिंदुस्थानसाठी दिलासा देणारी घटना होय.
बुमराहने अक्वल स्थान गमावले
यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला 5 स्थानांचा फटका बसल्याने तो थेट 11व्या स्थानावर फेकला गेलाय. याचबरोबर विराट कोहलीचीही एका झटक्यात सहाव्या स्थानावरून 688 च्या रेटिंगसह 14 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराहनेही ‘नंबर वन’चे सिंहासन गमावले असून 846 रेटिंग गुणांसह त्याची तिसऱया स्थानी घसरण झाली आहे. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा या फिरकीच्या जोडगोळीलाही 2-2 स्थानांचा फटका बसला असून, अश्विन चौथ्या, तर जाडेजा आठव्या स्थानावर घसरलाय.
रूट, रबाडा अक्वल!
यावेळी आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 903 झाले आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन 813 रेटिंगसह दुसऱया स्थानावर कायम आहे. हिंदुस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल 790 रेटिंग गुणांसह तिसऱया स्थानी आल्याने त्याने इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला (778 रेटिंग) चौथ्या स्थानी ढकलले. उस्मान ख्वाजानेही न खेळता एका स्थानाची प्रगती केली आहे. तो आता सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहेत. पाकिस्तानचा उदयोन्मुख फलंदाज सौद शकीलने 20 स्थानांनी झेप घेतली आहे. 724 रेटिंगसह तो आठव्या स्थानावर आलाय. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनेही आठ स्थानांची प्रगती केली असून, तो आता 711 च्या रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या क@गिसो रबाडाने 860 रेटिंग अक्वल स्थान काबीज केले.