गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानात मेड इन इंडियाचा जलवा पहायला मिळत आहे. हिंदुस्थानी जनता घरगुती उत्पादनांना प्राधान्य देत असल्याने स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली आहे. परिणामी, दिवाळी आणि धनत्रयोदशीनिमित्त चायनीज वस्तूंची मागणी हिंदुस्थानच्या बाजारात दिवसेंदिवस घटत आहे.
यंदाही दिवाळीत नागरिकांनी स्वदेशी वस्तू खासकरून सजावटीसाठी इलेक्ट्रिक्स वस्तूंना प्राधान्य दिले. चायनीज वस्तूंची मागणी घटल्याने आयातही कमी होत आहे. यामुळे चीनला सुमारे 1 लाख 25 हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) नुसार, यावर्षी धनत्रयोदशीला सुमारे 60 हजार कोटी रुपयांचा व्यापार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिवाळीपर्यंत हा आकडा एक लाख कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या काळात सोने-चांदी व्यतिरिक्त पितळेपासून बनवलेल्या भांड्यांची मोठी खरेदी झाली आहे. यंदा सुमारे 2500 कोटी रुपयांची चांदी खरेदी करण्यात आली. तर एका दिवसात 20 हजार कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली आहे.