महाविकास आघाडीमध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार नाही; बंडोबांची व्यवस्था केलीय, चेन्नीथला यांची माहिती

महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले असून आम्ही एकजुटीने निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहोत. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आमच्यात मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. तसेच बंडोबांचीही व्यवस्था करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला यांनी जागावाटपावरून महायुतीत उडालेल्या गोंधळावरही भाष्य केले. महायुतीमध्ये आपापसात भयंकर लढाई सुरू असून भाजप नेत्यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या जागांवर डल्ला मारलेला आहे. भाजपने या निवडणुकीत शिंदे आणि अजित पवार यांना संपवले आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांसह छोट्या मित्रपक्षांनाही समान वागणूक देण्यात आली आहे.

महायुतीमध्ये भाजपचे नेते शिंदे गटाच्या, अजित पवार गटाच्या चिन्हावर लढत आहे. याचा अर्थ भाजप 180 ते 182 जागा लढत असून महाविकास आघाडीत असे कोणतेही मतभेद नाहीत. बंडखोरांचे अर्ज मागे घेण्याचीही व्यवस्था केलेली आहे. हायकमांडने घोषणा केलेल्या उमेदवारांनाच आम्ही एबी फॉर्म दिला असून यादी जाहीर झाली त्यांचेच काम करा, असे निर्देश चेन्नीथला यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले.

तसेच या व्यतिरिक्त ज्यांनी अर्ज भरले त्यांनी माघार घ्यावी. महाविकास आघाडीमध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. आम्ही एकजुटीने काम करू. समाजवादी पार्टीशीही आम्ही संपर्कात असून 4 तारखेपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार बनवणे हे आमचे लक्ष्य आहे. यासाठी एकजुटीने काम करत असून जनतेलाही बदल हवा आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने हे स्पष्ट केलंय की शिंदे सरकार नालायक असून भ्रष्टाचारात बुडालेले आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. शिंदे सरकारने महाराष्ट्र लुटला असून याचा बदला घेण्यासाठी जनता तयार आहे, असेही चेन्नीथला म्हणाले.

राज्यामध्ये बदल घडवायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं! – संजय राऊत

लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाने बंद केली आहे. तिजोरीत पैसा नसल्याने सरकारने निवडणूक आयोगाद्वारे ही योजना बंद केली. फक्त निवडणुकीसाठी महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले. महायुतीतील नेत्यांनी निवडणूक जाहीर होण्याआधी अनेक निर्णय घेतले. त्यातील एकाचीही अंमलबजावणी करू शकले नाहीत. हा फक्त चुनावी जुमला आहे. जनतेचे स्वप्न महाविकास आघाडी पूर्ण करू शकते, त्यामुळे जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मत टाकावे, असे आवाहनही चेन्नीथला यांनी केले.

नवाब मलिकांच्या उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस; अजित पवार गटाने ऐकलं नाही, फडणवीसांनीच केलं उघड!