राज्यामध्ये बदल घडवायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं! – संजय राऊत

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी वाजतगाजत अर्ज भरला. आजपासून प्रचाराचे फटाके फुटण्यास सुरुवात होत असून यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आम्हाला या राज्यामध्ये बदल घडवायचा आहे. बदल घडवायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र राहणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

जागावाटपावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ज्या भागात जो पक्ष जिंकू शकेल त्यांनी तिथे लढायचे असे आम्ही ठरवले. त्यानुसार विदर्भात काँग्रेस सगळ्यात जास्त जागा लढवत असून मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात शिवसेना, तर पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. तसेच काही ठिकाणी दोन पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरला असून आघाडीमध्ये अशा घटना घडत असतात. आमच्याकडे 3 तारखेपर्यंत वेळ असून आम्ही एकत्र बसू आणि उमेदवारांची समजूत काढू.

आम्हाला राज्यात बदल घडवायचा आहे. बदल घडवायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. तीन पक्ष एकत्र असतात तेव्हा 288 जागा कुणा एकालाच लढता येत नाही. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची कुचंबना होते. तरीही आम्ही 90 टक्के जागांवरती तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे. उरलेल्या ठिकाणी पुढील दोन दिवसात तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू, असेही राऊत म्हणाले.

सांगली पॅटर्नचा उल्लेख करणाऱ्यांनाही राऊत यांनी उत्तर दिले. सांगली पॅटर्न आता लोकांनी विसरायला पाहिजे. महाविकास आघाडीचे काम सगळ्यांनी तिथे एकत्र केले असते तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील नक्कीच विजयी झाले असते. पण आमच्या मित्रपक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही, त्याच्यामुळे अपक्ष निवडून आले. आता सांगलीमध्ये सर्वत्र काँग्रेस पक्षात बंडखोऱ्या झालेल्या आहेत. सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील अधिकृत उमेदवार आहेत आणि विशाल पाटलांच्या वहिनी जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे. आता कोण कुणाच्या बाजूने उभे राहील? मिरजची जागा शिवसेनेला सुटली असून तानाजी सातपुते यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ज्या रोहित पाटलांनी लोकसभेत विशाल पाटलांचे काम केले. आज त्यांना सुद्धा असाच सांगली पॅटर्नचा सामना करावा लागतोय, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सांगोला, अलिबाग येथे शिवसेना उमेदवार निवडून आलेला आहे. निवडून आलेल्या जागा असल्या तरी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. शेकाप हा मित्रपक्ष असून जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे. निवडून आलेल्या जागांवरही आम्ही तडजोड करायला तयार आहोत. आम्ही हट्ट करून बसलेलो नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Maharashtra election 2024 – 1 मिनिट उशीर झाल्यानं माजी मंत्री निवडणुकीचा अर्ज भरण्यापासून ‘वंचित’

…तर गुजरातला जाऊन रहावं

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवलेल्या टाटा एअर बस प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. हा प्रकल्प नागपूरमध्ये होणार होता. त्यासाठी जमिनीची निश्चिती झाली होती. स्पेनच्या सहकार्याने हा प्रकल्प होणार होता आणि मालवाहू विमानांची निर्मिती खासगी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रथमच देशात होणार होती. यातून किमान 10 हजार लोकांना रोजगार मिळणार होता. पण मोदींच्या मनात आले आणि त्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून गुजरातला नेला. त्याचे काल उद्घाटन झाले. हा महाराष्ट्रावरचा अन्याय आहे असे आताच्या राज्यकर्त्यांना वाटत नसेल तर त्यांनी इथून हलावे आणि गुजरातला जाऊन रहावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.