वेळ निघून गेल्यावर कळते की वेळेची किंमत काय आहे हे आजपर्यंत आपण ऐकले आहे. याचाच प्रत्यय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना आला. अवघा एक मिनिट उशीर झाल्याने तीन वेळा आमदार राहिलेले अनीस अहमद हे उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले.
अनीस अहमद हे माजी मंत्री असून त्यांनी तीन वेळा आमदारकीही भूषवली आहे. काँग्रेसमधून तिकीट न मिळाल्याने नुकताच त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. वंचितकडून त्यांना उमेदवारीही जाहीर झाली. नागपूर मध्यमधून त्यांना तिकीट देण्यात आले होते.
विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार होते. मात्र अनीस अहमद हे तीन वाजून एक मिनिटांनी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मात्र बरोबर 3 वाजता अधिकाऱ्यांनी गेट बंद केल्याने अनीस अहमद हे अर्ज दाखल करू शकले नाहीत.
दरम्यान, वेळ संपण्यापूर्वी मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहोचलो होतो असा दावा अनीस अहमद यांनी केला. ते रात्री आठ वाजेपर्यंत अर्ज दाखल करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शड्डू ठोकून बसले होते. मात्र नियमानुसार त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली.
एनओसी आणि क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळेपर्यंत अडीच वाजले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतरही वाहतुकीचा खोळंबा असल्याने मला पायपीट करत जावे लागले. आमचा एक माणूस आत बसला होता आणि त्याला 8 नंबरचे टोकनही देण्यात आले होते. मात्र गेटजवळ सुरक्षा यंत्रणांनी तपासणीत वेळ घातला आणि त्यामुळे मला उशीर झाला, असा आरोप अनीस अहमद यांनी केला.