मोठे शक्तिप्रदर्शन करत बाबाजी काळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांनी आज प्रचंड रॅली आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या सभेत मित्रपक्षाच्या वतीने खेड-आळंदी मतदारसंघात भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला.

बाबाजी काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, उपनेते रवींद्र मिर्लेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या विजया शिंदे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, नाना टाकळकर, प्रदेश महिला उपाध्यक्षा राजमाला बुट्टे पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, सुरेश चव्हाण, संजय घनवट, अमोल पवार, ज्योती अरगडे, मृगेश काळे, प्रमोद गोतारणे, बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे आदींसह महाविकास आघाडीतील तालुक्यातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्ज दाखल केल्यानंतर खेड बाजार समितीच्या मैदानावर प्रचंड सभा झाली. यावेळी पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात असताना विद्यमान आमदारांनी दहशतीच्या आणि सत्तेच्या जोरावर जे केले त्याची परतफेड या निवडणुकीत करायची आहे. सर्वांनी एकजुटीने तालुक्यातील दहशत आणि दादागिरी शिवसैनिकांनी मोडीत काढण्याचे आवाहन आमदार सचिन अहिर यांनी केले.

जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे म्हणाले, “शरद पवार यांच्याशी गद्दारी करणाऱ्या मंबाजीला यावेळी नक्की घरी बसावे लागेल.”
रवींद्र मिर्लेकर म्हणाले, “आमदार सुरेश गोरे यांच्या विजयाने भगवा फडकला, आता पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. यासाठी बाबाजी काळे यांना निवडून द्या.”
बाबाजी काळे म्हणाले, “खेड तालुक्यातील पूर्व पश्चिम भागातील प्रश्न, तीन शहरांचे प्रलंबित प्रश्न अद्यापही सुटले नाहीत, एमआयडीसी रस्ते खराब झाले, तालुक्यातील युवा वर्गाला न्याय मिळाला नाही, महिलांना न्याय मिळाला नाही, आदिवासी भागातील नागरिकांना रोजगार नाही. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने मला साथ द्यावी.” सुत्रसंचालन सुदाम कराळे, आभार अमोल पवार यांनी मानले.