‘रेडीमेड’ मुळे टेलरिंग व्यवसायाची वीण उसवतेय

सण-उत्सव असो की विवाह समारंभ असो, नवीन कपडे परिधान करून तो साजरा करताना त्याला नावीन्याची झळाळी येते. त्यातच दिवाळी सण आणि नवीन कपडे हे समीकरणच आहे. दिवाळीत पूर्वी घरगुती टेलरकडून कपडे शिवून घेण्याची लगबग असायची.

मात्र, सध्या ‘स्टायलिश रेडीमेड’ कपड्यांमुळे पारंपरिक कपडे शिवण्याच्या व्यवसायाची वीणच उसवली आहे. त्यामुळे टेलरिंग व्यावसायिकांसमोर स्पर्धेत टिकून राहण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पारंपरिक कपडे शिवण्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे वास्तव समोर आले आहे.

रेडीमेड कपड्यांमुळे आमच्या पारंपरिक व्यवसायासमोर आवाहनच नव्हे तर अस्तित्वालाही धक्का दिला आहे. अनेक कुटुंबांवर उपासमारीचे आरिष्ट कोसळले आहे. काहींना स्थलांतर करावे लागले असून, काहींना अन्य व्यवसाय, मजुरी अशी कामे करावी लागत आहेत. तरुणांनी नव्या ट्रेंड्सचा स्वीकार केला तर त्यांना चांगली संधीही आहे.

पूर्वी ग्रामीण भागात बलुतेदार पद्धतीने कपडे शिवले जात असत. ‘फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेप्रमाणेच घरगुती टेलर हीसुद्धा परंपरा होती. दुकानातून कापड आणून ड्रेस शिवण्यासाठी शिंपी बांधवांकडे दिले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चक्र मोडकळीस आले आहे. सर्वांचाच तयार कपडे घेण्याकडे कल वाढल्याने कारागीर असणाऱ्या टेलरिंग व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या समस्येमुळे काहींना मोठ्या महानगरांत स्थलांतर करावे लागले, तर काहींनी उदरनिर्वाहासाठी वेगळा व्यवसाय सुरू केला. गेल्या काही वर्षांत रेडीमेड व्यवसायाने जम बसविला, तर कालौघात पारंपरिक शिवणकाम अस्ताला लागले. धावपळीचे युग असल्याने कपडे शिवून घेण्याची वेळखाऊ पद्धत मागे पडली. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत राज्यातून तसेच परराज्यातून आलेला कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. गोरगरीब कामगार वर्गाची कापड खरेदी करून ते शिवून घेण्याची ऐपत नसते. त्यामुळे ते स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या रेडीमेड कपडे खरेदीवर भर देतात. दुसरीकडे उच्चभ्रू वर्गाचा बॅण्डेड कपड्यांच्या शो-रूममधून, मॉलमधून फॅशनेबल रेडीमेड कपडे खरेदी करण्याकडे कल असतो. त्यामुळे पारंपरिक कपडे शिवण्याचा व्यवसाय अशा विविध समस्यांच्या चक्रात अडकलेला दिसून येत आहे.

टेलरिंग दुकानातच कापडविक्री

उदारीकरणामुळे सर्वच पारंपरिक व्यवसायांना नख लागले आहे. काहींनी काळाची पावले ओळखून दुकानांना स्टायलीश केले. अनेकांनी दुसरे पर्याय शोधले. नव्या ट्रेंडचा स्वीकारही केला. अनेक टेलरिंग व्यावसयिकांनी आता दुकानात कापडविक्री सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकाला टेलरच्या दुकानात कापड खरेदी करून तेथेच कपडे शिवून घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मात्र, काही टेलरिंग व्यावसायिक चौकटीबाहेर न पडल्याने व्यवसाय बुडाल्याने त्यांच्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला आहे.

नवीन पिढीची अनास्था

काळाची पावले ओळखून पारंपरिक व्यवसायात फारसे बदल झाले नाहीत. नव्या ट्रेंड्सचा अंगीकार न करणे, अत्याधुनिक यंत्रांची कमतरता, नवनव्या स्टाइल जाणून घेण्यासंबंधीचा अभाव, साधनांचा तुटवडा अशा नानाविध प्रश्नांनी पारंपरिक व्यवसायाचे आभाळच फाटले. त्यामुळे सद्यस्थितीत रफू करणे, बटण लावणे, उसवलेले शिवून देणे, चेन बसविणे अशी फुटकळ कामेच उरली आहेत. नवीन पिढीही या व्यवसायात येण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येते. तरुण वर्ग टेलरिंगचा परंपरागत व्यवसाय सोडून नवीन व्यवसायात उतरला आहे.