जिल्ह्यातील तीन हजार 85 शाळांमधील दोन लाख 51 हजार 278 विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आवाहन करणारे पत्र लिहून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये 74.11 टक्के मतदान झाले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी 80 टक्क्यांहून अधिक होण्याच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी कार्तिकेयन एस. आणि कोल्हापूर महापालिका आयुक्त तथा ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मतदान जनजागृतिपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये विद्याथ्यांच्या पत्रलेखनाचा उपक्रम घेण्यात आला. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करणारे पत्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना लिहिले. निर्भयपणे व योग्य उमेदवारास मतदान करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी या पत्रातून आवाहन करण्यात आले. या उपक्रमात एकूण तीन हजार 85 शाळांतील दोन लाख 51 हजार 287 विद्यार्थ्यांनी पत्रलेखन करून ही पत्रे पोस्टाद्वारे पाठविली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाची आवड निर्माण होऊन बालवयात लोकशाहीत मतदानाचे महत्त्व समजण्यासह जिल्ह्यात अडीच लाख कुटुंबांपर्यंत मतदान करण्याचा भावनिक संदेश पोहोचून मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केला.