शक्तिप्रदर्शन करीत साताऱ्यात शिवसेनेचे अमित कदम यांचा अर्ज दाखल

सातारा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमित कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारची ही लढाई धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती अशी असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेची हक्काची व्होट बँक असलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाटय़ाला ही जागा आली आहे. येथून पक्षाने उमेदवारीची माळ अमित कदम यांच्या गळ्यात घातली असून, शिवसेनेची धगधगती मशाल घेऊन अमित कदम जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अमित कदम यांनी असंख्य शिवसैनिकांसह दुपारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी जिल्हाप्रमुख हणमंत चवरे, सागर भोगावकर, योगेश गोळे, साधू चिकणे, माजी नगरसेवक बाळासाहेब बाबर, शिवसेनेचे शहरप्रमुख गणेश अहिवळे, काँग्रेसचे दत्ताजी धनावडे, महेश शिर्के, रिपाइंचे दीपक सपकाळ आदी उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित कदम यांनी पायी रॅली काढून प्रांत सुधाकर भोसले यांच्यासमक्ष अर्ज दाखल केला. या रॅलीत म्हाते, केळघर, कुडाळ, करंजे, सावली, चोरांबे, कुडाळ, सोमर्डी, आरे दरे, गजवडी, कारी येथील कार्यकर्ते उपस्थित होते.