अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या; चिचोंडी पाटील ग्रामस्थांची मागणीसाठी निदर्शने

चिचोंडी पाटील येथील नंदी मारुतीवस्ती येथे अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे चिचोंडी पाटील व परिसरात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. तसेच याप्रकरणी खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी चिचोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, खटला फास्ट ट्रक कोर्टात चालून पीडित महिलेच्या वतीने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी व सहा महिन्यांत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत. तसेच पीडित कुटुंबाची जबाबदारी शासनाने घेऊन कुटुंबातील लहान दोन मुलांचे शिक्षण व पालन-पोषणासाठी विशेष बाब म्हणून निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा. मृताचे पती हे नगर जिल्हा परिषद सेवेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत असून, त्यांना शासकीय सेवेत नियमित करावे. तसेच जिह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांसाठी सेविका व मदतनीस दोन्ही पदांची मिनी अंगणवाडीसाठी तत्काळ नियुक्ती करून सर्व अंगणवाडी केंद्रांत विद्युतपुरवठय़ासह सीसीटीव्ही कॅमेरे व अलार्म बसविण्यात यावेत. जिह्यातील सर्व अंगणवाडय़ांमधील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत व लाभार्थी पुरुष पालकांनी अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्या पाल्याचा पोषण आहार नेण्यासाठी येऊ नये, महिलांना पाठवावे, याबाबत आदेश काढण्यात यावेत. गावामध्ये बाहेरील तालुक्यातील, जिह्यातील, परप्रांतीय, अनोळखी व्यक्ती कामासाठी व इतर कारणासाठी राहायला आल्यास पोलीस प्रशासनाकडून त्याची चारित्र्य पडताळणी होण्याची आवश्यकता असून, या प्रक्रियेसाठी गावातील अनेक वर्षांपासून बंद असलेली पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी सरपंच शरद पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, माजी सभापती प्रवीण कोकाटे, उपसरपंच यशोदा कोकाटे, योगिराज गाडे, अरुण म्हस्के, चंदू पवार, प्रशांत कांबळे, मच्छिंद्र खेडकर, वैभव कोकाटे, संतोष खराडे आदी उपस्थित होते.