वडूज तहसील कार्यालयातील महसूल सहायक प्रवीण नांगरे याच्यावर 55 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी सुमारे एक वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये अधिक तपासाअंती विद्यमान तहसीलदार बाई माने यांच्यासह आणखी तीन तलाठ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार मूळ गुह्यातील कलमांमध्ये वाढ करून बाई माने व तलाठ्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
वडूज तहसीलदार बाई सर्जेराव माने, महसूल सहायक रवींद्र आनंदा कांबळे, औंध तलाठी धनंजय तडवळेकर, भोसरे (ता. खटाव) तलाठी गणेश मोहन राजमाने अशी नव्याने गुह्यात सहआरोपी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सातारा ‘एसीबी’चे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी माहिती दिली. या प्रकरणातील तक्रारदार यांचे दोन डंपर वडूज महसूल विभागाने पकडले होते. संबंधित दोन्ही डंपर सोडविण्यासाठी नांगरे याने 55 हजार रुपयांच्या लाचेची मागणी 21 नोव्हेंबर 2023 रोजी केली. ही रक्कम दुसऱया दिवशी म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी नांगरे याने तक्रारदार यांना त्याच्या ब्रीझा कारमध्ये ठेवण्यास सांगितली. यावरून सातारा ‘एसीबी’ने सापळा रचून कारवाई करीत प्रवीण नांगरे याला अटक केली. सातारा एसीबीने ही कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास पुणे एसीबी कार्यालयाच्या अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे यांनी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळत गेली व त्यानुसार या प्रकरणात नांगरे याच्याप्रमाणेच तहसीलदार बाई माने व तीन तलाठय़ांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यावरून मूळ दाखल गुह्यात कलमांची वाढ करून नांगरे याच्याप्रमाणे आणखी चारजणांची नावे सहआरोपी म्हणून घेण्यात आली.
तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला; 4 रोजी सुनावणी
वडूज लाचप्रकरणात सहआरोपी केले जाणार असल्याची कुणकुण तहसीलदार यांच्यासह इतर तिघांना झाली. त्यानुसार अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी वडूज न्यायालयात अर्ज दाखल केला. यावर सुनावणी झाली असता, न्यायाधीशांनी चौघांना तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आता या प्रकरणाकडे तालुक्यासह संपूर्ण जिह्याचे लक्ष लागले आहे.