दिल्लीतील ग्रेटर नोएडामध्ये छापेमारी करत दिल्ली पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. या छापेमारीत तब्बल 95 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली असून दिल्लीतील एक व्यापारी आणि मुंबईतील एका केमिस्टद्वारे हे ड्रग्ज रॅकेट चालवण्यात येत होते, अशी माहिती या कारवाईनंतर उघड झाली आहे.
या ड्रग्ज रॅकेटमध्ये तिहार जेलच्या वॉर्डनचाही सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला. दिल्ली पोलिसांना या ड्रग्ज रॅकेटसंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल 95 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. या ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे? हे ड्रग्ज कुठे विकण्यात येत होते? या संपूर्ण प्रकरणात तिहार जेलच्या वॉर्डनचा नेमका कसा सहभाग होता? त्याच्यासह आणखी कोण आणि कोठून सहभागी होते? ड्रग्ज कशा प्रकारे तयार केले जात होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.