मराठवाड्यात भगव्याचा लखलखाट! शिवसेनेच्या शिलेदारांचे धुमधडाक्यात अर्ज दाखल

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मराठवाडा भगव्या लखलखाटाने उजळून निघाला! शिवसेनेच्या शिलेदारांनी वाजतगाजत, धुमधडाक्यात आपापले अर्ज दाखल केले. परभणी येथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत डॉ. राहुल पाटील यांनी उमेदवारी दाखल केली. भूम-परंड्यातून रणजीत पाटील, उमरग्यातून प्रवीण स्वामी, हिंगोलीतून रूपाली पाटील गोरेगावकर तसेच कळमनुरीतून डॉ. संतोष टारफे, वैजापुरातून डॉ. दिनेश परदेशी आणि छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांनी अर्ज दाखल केले. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर मित्रपक्षांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत विरोधकांना धडकी भरवली. कळमनुरीत गद्दार संतोष बांगरला अस्मान दाखवण्यासाठी मैदानात उतरलेले डॉ. संतोष टारफे यांनी प्रचंड रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भूम-परंड्यात ‘खेकडा’ फेम तानाजी सावंत यांची गुर्मी उतरवण्याठी शिवसेनेने रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना मैदानात उतरवले आहे. रणजीत पाटील यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी भूम-परांडेकर स्वयंस्फूर्तीने आले होते.

परभणी येथे डॉ. राहुल पाटील यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आपली उमेदवारी दाखल केली. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने परभणी शहर दुमदुमून गेले होते. उमरग्यात प्रवीण स्वामी यांनी मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज भरला. गद्दार ज्ञानेश्वर चौगुले यांच्याशी त्यांचा सामना आहे. हिंगोलीत रूपाली पाटील गोरेगावकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपली उमेदवारी दाखल केली. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत महिलांचा प्रचंड सहभाग होता. वैजापुरात डॉ. दिनेश परदेशी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. गद्दार रमेश बोरनारे यांना चितपट करण्यासाठी वैजापूरकर मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी ग्रामदैवत संस्थान गणपतीचे दर्शन घेतले.

मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून उमेदवारी परत घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानंतरच लढतींचे चित्र खर्‍या अर्थाने स्पष्ट होईल.