23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा – चिराग चिकाराला सुवर्णपदक!

हिंदुस्थानच्या 18 वर्षीय चिराग चिकाराने 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अखेरच्या दिवशी पुरुषांच्या 57 किलो फ्रिस्टाईल गटात सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य व 7 कांस्य अशी एकूण नऊ पदकांची कमाई केली. हिंदुस्थानला या स्पर्धेत चिरागच्या रूपाने एकमेव सुवर्णपदक मिळाले, हे विशेष.

चिराग चिकाराने चुरशीच्या अंतिम लढतीत किर्गिस्तानच्या अब्दिमलिक काराचोव याचा ४-३ गुण फरकाने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अमन सहरावत याच्यानंतर या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा चिराग हा दुसरा हिंदुस्थानी पुरुष कुस्तीपटू ठरला. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सहरावतनेही गतवर्षी याच 57 किलो गटात सोनेरी यश संपादन केले होते. याचबरोबर महिला गटात रितिका हुड्डाने 76 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते.

पुरुषांच्या फ्रि-स्टाईल गटात हिंदुस्थानच्या सुजीत कलकलने 70 किलो गटात ताझिकिस्तानच्या मुस्तफो अखमेदोव याचा 13-4 गुण फरकाने धुव्वा उडवित कांस्यपदक जिंकले. विक्की चाहरने 97 किलो गटात युक्रेनच्या बलाढ्य इवान प्रिमेचेंको याचा 7-2 गुणांनी पाडाव करीत कांस्यपदक मिळविले. अभिषेकने 61 किलो गटात शनिवारी कांस्यपदक जिंकून हिंदुस्थानच्या पदकाचे खाते उघडले होते. त्यानंत हिंदुस्थानी मल्लांनी चार
पदके जिंकली.

महिला संघ पाचव्या स्थानी

23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. यात अंजलीने 59 किलो गटात रौप्यपदकाची कमाई केली. याचबरोबर नेहा शर्मा (57 किलो), शिक्षा (65 किलो) आणि मोनिका (68 किलो) यांनी कांस्यपदक जिंकले. ग्रिको रोमन प्रकारात हिंदुस्थानच्या विश्वजित मोरेला एकमेव कांस्यपदक मिळाले. त्याने 55 किलो गटात ही कामगिरी केली.

दोन वर्षांनंतर ‘जन गन मन’ची धून

गतवर्षी ऋतिका हुड्डा या स्पर्धेत सहभागी झाली होती मात्र, त्यावेळी राष्ट्रीय कुस्ती महासंघावर बंदी असल्याने ऋतिका यूडब्ल्यूडब्ल्यूच्या ध्वजाखाली खेळावे लागले होते. त्यामुळे सुवर्ण जिंकल्यानंतर त्यावेळी हिंदुस्थानचे राष्ट्रगीत ‘जन मन गन’ची धून वाजली नाही. मात्र, या वर्षी चिराग चिकाराने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर अखेर आपल्या राष्ट्रगिताची धून वाजली.

हिंदुस्थानचे पदकविजेते

सुवर्ण : चिराग चिकारा (पुरुष, 57 किलो), रौप्य : अंजली (महिला, 59 किलो), रौप्य – शिक्षा (महिला, 65 किलो), कांस्य : मोनिका (महिला, 68 किलो), कांस्य : नेहा शर्मा (महिला, 57 किलो), कांस्य विश्वजीत मॉर्न (पुरुष, 59 किलो), कांस्य ग्रीस मॉर्न (पुरुष, 59 किलो), कांस्य : विकी (पुरुष, 97 किलो), कांस्य सुजित कलकल (पुरुष 70 किलो), कांस्य : अभिषेक ढाका (पुरुष 61 किलो).