>> अभय कुलकर्णी
उत्तर आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात उष्ण वाळवंट म्हणून ओळखले जाते. एकेकाळी सहाराचा प्रदेश हिरवागार होता. झाडे, वनस्पती, वन्य प्राणी आणि मानवही या ठिकाणी राहत असत. परंतु ही हिरवळ कमी होत गेल्याने सुमारे 2500 वर्षांपूर्वी हे ठिकाण वाळवंट बनले. 2016 मध्ये या वाळवंटात झालेल्या बर्फवृष्टीने जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. तसाच धक्का अलीकडेच या वाळवंटात झालेल्या अतिवृष्टीने दिला आहे. सहारातील पाऊस हा रणरणत्या वाळवंटाला काही काळासाठी गारवा देणारा ठरला असला तरी त्याने केलेला धोक्याचा घंटानाद चिंताजनक आहे.
जगात असे अनेक देश आहेत जिथे सुंदर धबधबे आहेत, कुठे नद्या तर कुठे नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेली जंगले आहेत, तर कुठे निळाशार समुद्रकिनारा, तर कुठे बर्फाच्छादित हिमशिखरे आहेत. पण आजूबाजूला फक्त वाळू, प्रचंड उष्णता आणि दूरवर माणूस नाही, हिरवाई नाही. केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी झाडे… अशी भेदक स्थिती असणारे वाळवंटी प्रदेशही या भूतलावर आहेत. भारतात थरचे वाळवंट हे सर्वांत मोठे वाळवंट मानले जाते. परंतु उत्तर आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात उष्ण वाळवंट म्हणून ओळखले जाते. सहारा हे नाव ‘सहरा’ या अरबी शब्दावरून आले असून याचा अर्थच मुळात वाळवंट आहे. सहारा वाळवंटाची लांबी 4800 किलोमीटर आणि रुंदी 1800 किलोमीटर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे वाळवंट भारताच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे. तब्बल 10 देशांमध्ये ते पसरलेले असून यामध्ये माली-मोरोक्को, मॉरिटानिया, अल्जेरिया, टय़ुनिशिया, लिबिया, नायजर, चाड, सुदान आणि इजिप्त यांसारख्या देशांचा समावेश आहे.
सहारा वाळवंटात अनेक वाळूचे ढिगारे आहेत, ज्यांची उंची 200 मीटरपर्यंत आहे. या वाळवंटाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे माऊंट कौसी, ज्याची उंची 3415 मीटर आहे. एकेकाळी सहाराचा प्रदेश हिरवागार होता. झाडे, वनस्पती, वन्य प्राणी आणि मानवही या ठिकाणी राहात असत. परंतु ही हिरवळ कमी होत गेल्याने सुमारे 2500 वर्षांपूर्वी हे ठिकाण जगातील सर्वात मोठे वाळवंट बनले. 2005 आणि 2006 मध्ये नॅशनल जिओग्राफिकने एक अहवाल प्रकाशित केला होता, ज्यामध्ये सहारामध्ये सुमारे 200 थडग्यांचा शोध लागल्याचे समोर आले होते. यावेळी एक मोठी स्मशानभूमी आढळून आली. तेथे मानव आणि प्राण्यांची हाडे सापडली होती. तसेच मोठय़ा माशांचे आणि मगरींचे अवशेषदेखील सापडले.
इतर वाळवंटांप्रमाणेच सहारामध्येही दिवसा तीव्र उष्णता जाणवते. पण इथे थंडी अजिबात जाणवत नाही. याला अपवाद ठरला तो 2016 मध्ये. या वर्षी सहाराच्या वाळवंटात बर्फवृष्टी झाली होती. यामुळे जगाला आश्चर्याचा धक्का बसला. तज्ञांनी यामागचे कारण शोधले असता असे आढळून आले की, सहारा वाळवंटाच्या जवळ असलेल्या ऍटलस पर्वताच्या पायथ्याशी तापमान सामान्यपेक्षा 10-15 अंशांनी कमी झाले होते, उंचावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या केंद्रामुळे वारे खालील दिशेने वाहिले आणि हिमवर्षावासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
अलीकडेच सहारा वाळवंटाने असाच आश्चर्याचा धका दिला आहे. या वाळवंटात गेल्या 50 वर्षांत प्रथमच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. विचित्र हवामानामुळे मोरोक्कोला लागून असलेल्या सहारा वाळवंटात दोन दिवस पाऊस पडत होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली आहे. मोरोक्कोची राजधानी राबाटपासून सुमारे 450 किमी अंतरावर टाटा नावाचा परगणा आहे. या भागात एक गाव आहे, टॅगौनाइट. येथे सर्वाधिक म्हणजे एका दिवसात 100 मिमी पाऊस पडला. महाराष्ट्रात 450 मिमी पाऊस पडल्याचा अनुभव घेतलेल्यांना या पावसाचे फारसे नवल वाटणार नाही. पण सहारा हा वाळवंटीय भाग आहे हे लक्षात घ्यायला हवे. 100 मिमी पाऊस हा तेथील वार्षिक सरासरीपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. सहारामध्ये सध्या उन्हाळा असूनही अतिवृष्टी झाल्याने शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. या पावसामुळे इरिकी तलाव पुन्हा पाण्याने भरला. हा तलाव 1925 पासून कोरडा पडला होता. पावसामुळे सॅटेलाइट इमेजेसमध्ये सौंदर्य वाढल्याचे दिसून येत आहे. कारण वाळवंटाच्या मध्यभागी असलेला पाण्याचा एवढा मोठा स्रोत पुन्हा जिवंत झाला. असा पाऊस अनेक दशकांपासून पाहिला नव्हता, असे तेथील नागरिक सांगताहेत. या पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली असली तरी हे हवामानही लोकांसाठी धोकादायक आहे.
मोरोक्कनच्या हवामान शास्त्रज्ञांच्या मते, हवामान बदलामुळे हा बदल झाला आहे. सध्या या भागात हवामान बदलत आहे. भविष्यात अशा आणखी घटना घडण्याची शयता आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील हवेत आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे सहारामध्ये टोकाच्या हवामानाच्या घटना पाहायला मिळण्याची भीती होतीच. या पावसाचा एक फायदा असाही झाला आहे की, स्थानिक शेतकऱयांचे चेहरे उजळले आहेत. कारण अनेक वर्षे हा भाग दुष्काळाचा सामना करत आहे.
यंदाच्या पावसामुळे अचानक आलेल्या पुरात 18 जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी पिकांचेही नुकसान झाले आहे. मोरक्कन सरकार लोकांपर्यंत मदत साहित्य पोहोचवत आहे. भरपाईही देत आहे. गेल्या वर्षीच्या भूकंपातून हा परिसर अजून सावरला नव्हता. तशातच हे नवे संकट ओढावले आहे. सहारा वाळवंट हा 90 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा प्रदेश अलीकडील काळात ग्लोबल वार्ंमगचा बळी ठरत आहे. जगाच्या बदलत्या हवामानाचा या भागावरही परिणाम होणार आहे.
चालू वर्षी एप्रिल महिन्यात आखाती प्रदेशाचा एक भाग असलेल्या दुबईमध्ये अवघ्या 20 तासांत तब्बल 142 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला आणि ढगफुटीसदृश या पावसाने दुबईची पार वाताहत करून टाकल्याचे दिसून आले. दुबईपासून 130 किमी अंतरावर असलेल्या ‘अल एन’ या शहरात तब्बल 245 मिमी पावसाची नोंद झाली. दुबईच्या पूर्व किनाऱयावर असलेल्या फुजिराह येथेही 145 मिमी पावसाची नोंद झाली. दुबईत साधारणतः वर्षभरात एवढा पाऊस पडतो.
जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणाऱया हवामान बदलांचे हेच वैशिष्टय़ आहे. अशा अनपेक्षित आक्रितांचा सामना मानवजातीला करावा लागणार हे गेल्या दोन दशकांपासून पर्यावरणतज्ञ ओरडून सांगत आहेत. पण विकासाच्या कानठळ्या बसवणाऱया गजरापुढे त्याकडे दुर्लक्ष होत गेले. दुबईतील हवामान परिषदेत लहान बेटे आणि गरीब देशांचे प्रतिनिधी ‘तुमच्या पापांची फळे आम्ही का भोगायची, आम्हाला वाचवा’ असा म्हणत टाहो फोडताना दिसले होते. याचे कारण पर्यावरणाचे, निसर्गाचे दोहन करून औद्योगिक क्रांतीची कास धरत विकसित बनलेल्या पाश्चिमात्य देशांमुळे पृथ्वीवरील तापमानवाढीचा वेग वाढला आहे आणि आज त्याची फळे गरीब-विकसनशील देशांना भोगावी लागत आहेत. सहारातील पाऊस हा रणरणत्या वाळवंटाला काही काळासाठी गारवा देणारा ठरला असला तरी त्याने केलेला धोक्याचा घंटानाद चिंताजनक आहे.