सामना अग्रलेख – संगमनेरचा दंगा, मातृवंदनेचा अपमान

महिलांवर अत्याचार करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे लोक फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बसले आहेत. हाच भाजपचा खरा चेहरा आहे. बदलापूर प्रकरणात खऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला. तसा संगमनेरच्या देशमुखबाबतही झाला. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत वापरलेली भाषा देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का? महाराष्ट्राच्या परंपरेत महिलांचा अपमान कोठेच बसत नाही. भारतीय संस्कृती सर्वत्र मातृवंदना करीत आहे. त्या मातांचा, बहिणींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही!

मिंधे सरकारने महिलांची मते मिळविण्यासाठी ‘लाडकी बहीण’योजनेची सुरुवात केली. आपणच कसे महिलांचे तारणहार आहोत व महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करून महिलांची कशी काळजी घेत आहोत हे दाखवले जात असले तरी भाजपची ‘संस्कृती’ काय त्याचे दर्शन रोज घडत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या सुविद्य कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी ज्या अर्वाच्य, अश्लील भाषेचा प्रयोग भाजप पुढाऱ्यांनी केला, त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच. डॉ. जयश्री या संगमनेर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा आहेत. संगमनेरमधील एका सभेत ‘‘माझा बाप सगळ्यांचा बाप,’’ असे वक्तव्य करताच भाजपचा स्थानिक नेता वसंत देशमुख याने अत्यंत घाणेरड्या शब्दांत जयश्री थोरात यांच्यावर लाखोली वाहिली. देशमुख महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जाहीर धिंडवडे काढत असताना ‘विखे’पुत्र व्यासपीठावर दुर्योधनाप्रमाणे मांडीवर थाप मारीत विकट हास्य करीत होते व भाजप समर्थक श्रोते टाळ्या वाजवून विकृत वसंत देशमुखला उत्तेजन देत होते. जयश्री थोरात या काँग्रेस पक्षाचे तरुण नेतृत्व आहेत. त्यांच्या भाषणात तसे काहीच चुकीचे नव्हते. ‘‘माझा बाप हा सगळ्यांचा बाप आहे’’ या वक्तव्याबद्दल वसंत देशमुखाच्या विजारीत मिरच्या झोंबण्याचे कारण काय? भाजपवाल्यांचे मायबाप मोदी-शहा आहेत, पण अनेक बाटगे भाजपात सामील होऊन त्यांनी मोदी-शहा आपले बाप असल्याचे जाहीर केले. सत्ता बदलली की बाप बदलणारे हे लोक आहेत व त्यात नगर जिल्हाही मागे नाही. नगर जिल्ह्यात सुजय विखे यांचा पराभव लोकसभेत झाला व विधानसभेत सुजय यांच्या पूज्य पिताश्रींना

पराभवाचा सामना

करावा लागत आहे. त्यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात रणरागिणी प्रभावती घोगरे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे विखे व त्यांच्या भाजपचा महिलांवर राग राग सुरू झाला. त्यातून शिर्डीत प्रभावतीताई व संगमनेरात जयश्रीताई यांच्यावर घाणेरड्या शब्दांत हल्ले सुरू आहेत. जयश्री थोरात यांच्या बाबतीत विखे समर्थक देशमुखने घाणेरडे शब्द वापरताच त्याचे तीव्र पडसाद उमटले. वसंत देशमुखला अटक करा या मागणीसाठी हजारो महिलांनी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले. संतप्त तरुणांनी संगमनेरात जाळपोळ केली. अनेक गावांत कडकडीत बंद पाळून विखे-देशमुख विकृतीचा निषेध केला, पण त्या नालायक देशमुखवर गुन्हा दाखल करायला फडणवीस-विखेंचे पोलीस तयार नव्हते. अखेर जनतेच्या संतापाचा रेटा खूपच वाढला आणि दोन दिवसांनी वसंत देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून फडणवीसांच्या पोलिसांनी त्याला अटक केली. महिलांची बदनामी करणाऱ्यांना, अत्याचार करणाऱ्यांना संरक्षण द्यायचे हेच भाजपचे धोरण स्पष्ट दिसते. वसंत देशमुख या चिल्लर माणसाला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यास फडणवीस यांच्या गृह मंत्रालयाने इतका विलंब का केला? वसंत देशमुखला अटक होऊ नये म्हणून पोलिसांवर कोणाचा दबाव होता हे नगर जिल्ह्यातील जनतेस माहीत आहे. आपल्या राजकीय विरोधकांवर खुनी हल्ले करून दहशत माजवायची हे उद्योग विखे साम्राज्यात सुरूच आहेत. नगर शहरात जगतापांची दादागिरी व ताबेदारी, तर उरलेल्या जिल्ह्यात विखे मंडळींची हाणामारी असे चित्र आहे. विखे यांचे पुत्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले ते याच दादागिरीमुळे. लोकांच्या

संतापाचा उद्रेक

झाला व त्यांनी विखे यांचा पराभव केला. त्या पराभवामागे बाळासाहेब थोरातांचे नियोजन असल्याचा राग विखे समर्थकांच्या मनात खदखदू शकतो, पण म्हणून थोरातांच्या कन्येवर घाणेरड्या शब्दांत चिखलफेक करण्याचे समर्थन कोणी करणार नाही. वसंत देशमुख हा विख्यांचा हस्तक आहे. त्यामुळे झाल्या प्रकाराबद्दल विखेंनी समस्त महिला वर्गाची माफी मागायला हवी होती. तसे झालेच नाही. उलट वसंत देशमुखला वाचवण्याची मोहीम त्यांनी सुरू केली. लाडक्या बहिणी फक्त 1500 रुपयांच्या बदल्यात मते विकत घेण्यापुरत्याच आहेत का? असा प्रश्न त्यामुळे पडतो. भाजपच्या महिला मोर्चाच्या नकली वाघिणी एरवी अशा घटनांवर आपले दात विचकत बोलत असतात, पण भाजपच्या नालायकाने सुविद्य बहिणीबाबत जे उद्गार काढले त्याबद्दल भाजपची एकही महिला नेता बोलत नाही. खरोखरच महिलांची प्रतिष्ठा, सुरक्षेची एवढी कळकळ असती तर या भाजपच्या महिलांनी देशमुखच्या अटकेसाठी संगमनेर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला असता, पण महिलांवर अत्याचार करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे लोक फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बसले आहेत. हाच भाजपचा खरा चेहरा आहे. बदलापूर प्रकरणात खऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला. तसा संगमनेरच्या देशमुखबाबतही झाला. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत वापरलेली भाषा देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का? महाराष्ट्राच्या परंपरेत महिलांचा अपमान कोठेच बसत नाही. भारतीय संस्कृती सर्वत्र मातृवंदना करीत आहे. त्या मातांचा, बहिणींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही!