काटोलमधून सलील देशमुख मैदानात, दोन मिनिटं उशीर झाला… आज अर्ज भरणार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघातून माघार घेत आपला मुलगा सलीलला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. सलील देशमुख हे सोमवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दीसोबत निवडणूक कार्यालयात गेले. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन मिनिटांचा उशिर झाल्यामुळे ते आज अर्ज दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रवादीने देशमुख यांचे नाव पहिल्याच यादीत जाहीर केले होते, परंतु मी किंवा सलील दोघांपैकी एक जण निवडणूक लढवू, हे आपण 28 ऑक्टोबरला जाहीर करू असे अनिल देशमुख यांनी म्हटले होते. त्यामुळे आता काटोलमधून सलील देशमुख निवडणूक लढवणार आहेत. भाजप सरकार तीन वर्षांपासून माझ्या मागे लागले आहे तरी त्यांच्या बापाला मी घाबरत नाही. मी काटोलमधून उमेदवारी फॉर्म भरला नाही. कारण अनिल देशमुख यांनी फॉर्म भरला, तर काही तरी तांत्रिक अडचणी काढायची आणि तो फॉर्म रद्द करायचा असे नियोजन सत्ताधाऱयांनी केले होते. त्यासाठी दिल्लीतून मोठे वकील आणून ठेवले आहेत. जे रश्मी बर्वेसोबत झाले तसेच माझ्यासोबत करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. मी निवडणूक लढत नसलो तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मी मंत्री होणार आहे, असेही ते म्हणाले.