
बॉलिवूड मधील आयकॉनिक विनोदी भूमिका साकारणारा अभिनेता राजपाल यादव आता पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करण्याकरीता सज्ज झाला आहे. भूल भूलेय्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा तिसरा सीक्वेल लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून राजपाल यादव छोटे पंडित या भूमिकेत पुन्हा पाहायला मिळणार आहे.
यापूर्वी राजपाल यादवने अक्षय कुमार स्टारर “भूल भुलैय्या” (2007) मध्ये पहिल्यांदा छोटे पंडितची भूमिका साकारली होती. “भूल भुलैय्या 2” मध्ये अक्षय ऐवजी कार्तिक आर्यनला घेण्यात आले. राजपालने तिसऱ्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.
एएनआय या वृत्त संस्थेशी संवाद साधताना, राजपाल यादवने तिन्ही चित्रपटांमधील त्याच्या व्यक्तीरेखेबद्दल सांगितले. 2007 मधील पहिल्या चित्रपटापासून, छोटे पंडितचे पात्र लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. त्याचबरोबर ते अद्याप ही सोशल मीडियावरील मीम्समध्ये पाहायला मिळते.
नवीन चित्रपटातील त्याच्या पात्राच्या तपशीलांबद्दल बोलताना राजपाल म्हणाला, ‘तो केवळ एक पात्र नाही तर एक व्यंगचित्र, एक टिपिकल कॉमिक मॉडेल आहे. आपल्या संस्कृतीत, भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्रा’मध्ये सूत्रधार किंवा उपहासात्मक अशा पात्रांचा उल्लेख आढळतो. छोटा पंडित हा एक प्रकारचा आहे, एक पात्र स्वतःची खिल्ली उडवतो आणि इतर कोणाची नाही, तो कथेला कॉमिक रिलीफ आणतो.
दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यन आणि राजपाल यादव यांच्यासोबतच या चित्रपटात विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत.