पनवेल, कर्जत, उरणमधील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती
शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी दैनिक सामनाच्या मुंबई आवृत्तीत रायगड जिह्यातील पनवेल उरण कर्जत मधील महिला कार्यकर्त्यांच्या नियुत्त्या जाहीर झाल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या नियुत्त्यांना स्थगिती देण्यात आली आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे
शांताबाई शेळके पुरस्कार
दादर पश्चिम येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे शांताबाई शेळके साहित्य पुरस्कार डॉ. वसंत पाटणकर (समीक्षा), डॉ. प्रदीप कर्णिक (साहित्य संशोधन), प्रा. मधुकर वाकोडे (लोकसाहित्य) यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार सोहळा 29 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख तर प्रमुख पाहुणे कवयित्री उषा मेहता, डॉ. नितीन रिंढे, डॉ. मुकुंद कुळे, रवींद्र गावडे आहेत.
अकॅडमींचे विलिनीकरण
मुंबईतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण मिळून स्पर्धा परीक्षांमध्ये ते टॉपर्स ठरावेत यासाठी आघाडीच्या दोन अकॅडमी आज एक झाल्या. अरिहंत अकॅडमीने झील अकॅडमी टेकओव्हर केल्याची घोषणा केली. या विलिनीकरणामुळे विद्यार्थ्यांना आता उच्च दर्जाचे कोचिंग, आवश्यक सुविधा आणि वैयक्तिक मार्गदर्शन आणखी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे.
दिवाळी अंक-ग्रंथ प्रदर्शन
ताडदेवच्या जनता केंद्र वाचनालयातर्फे दिवाळी अंक व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन 31 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता जनता केंद्र, ताडदेव तुळशीवाडी येथे होईल. अध्यक्षस्थानी पत्रकार रवींद्र आंबेकर आहेत, तर प्रमुख वक्त्या संध्या नरे- पवार आहेत. प्रदर्शन 1 नोव्हेंबरपर्यंत खुले राहील.