गणेश हंडोरे यांच्यावरील पोलीस कारवाई संशयास्पद, हायकोर्टाने मंजूर केला 15 हजार रुपयांचा जामीन

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे यांच्यावर पोलिसांनी लावलेल्या सदोष मनुष्यवधाच्या कलमावर उच्च न्यायालयाने संशय व्यक्त केला आहे. तसेच गणेश हंडोरे यांना न्यायालयाने 15 हजार रुपयांचा जामीनही मंजूर केला आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी गणेश यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी गणेश यांना अटक केली. याविरोधात गणेश यांनी याचिका केली आहे.

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ही अटक बेकायदा आहे. कारवाई करताना पोलिसांनी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे जामिनावर सुटका करावी, अशी मागणी गणेश यांच्याकडून करण्यात आली. या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्यासाठी पोलिसांनी वेळ मागितला. त्याची नोंद करून घेत खंडपीठाने गणेश यांना जामीन मंजूर केला. या घटनेत सदोष मनुष्यवधाचे कलम लागू शकते का याबाबत आम्हाला शंका आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

अजामीनपात्र कलम नंतर नमूद केले

घटना घडली तेव्हा विविध कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला. ही सर्व कलमे जामीनपात्र गुह्याची आहेत. सदोष मनुष्यवधाचे कलम अजामीनपात्र आहे. हे कलम पोलिसांनी नंतर नमूद केले, असे निरीक्षणही न्यायालयाने नमूद केले.