अश्लाघ्य टीकेच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली तरीही जयश्री थोरातांसह समर्थकांवर दोन वेगवेगळे गुन्हे

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत करण्यात आलेल्या अश्लाघ्य टीकेने संगमनेरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. या सर्व घडामोडींतून आमदार थोरात समर्थक आणि डॉ. जयश्री थोरात यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळय़ा कलमांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा संतापाची लाट उसळली असून, हा प्रकार म्हणजे ज्याच्यावर अन्याय, त्याच्यावरच गुन्हा दाखल, असा झाला असल्याचा आरोप थोरात समर्थकांनी केला आहे. याबाबत शेकडो महिलांनी एकत्र येत आज प्रांत कार्यालय आणि संगमनेर शहर पोलिसांना निवेदन दिले. विखे-पाटील समर्थक कार्यकर्त्यांवर गाडय़ा अडवून हल्ला करण्यात आल्याचा गुन्हा थोरात समर्थकांवर दाखल करण्यात आला आहे. या गुह्यामध्ये आमदार थोरात यांच्या चुलत बंधूंसह पक्षाच्या पदाधिकाऱयांची नावे आहेत.

माझी बदनामी होऊनही माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा – जयश्री थोरात

माझी बदनामी करून माझ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडय़ा जाळल्या; वाहने तोडली, फलक जाळले, याप्रकरणी माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गाडय़ा, वाहने दुरुस्त करता येतील, नव्या घेता येतील; परंतु महिलांची काढलेली अब्रू परत मिळत नाही, अशी खंत डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केली.

मणीपूर, बिहारसारखी महाराष्ट्राची स्थिती – दुर्गा तांबे

दुर्गा तांबे म्हणाल्या, ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर सर्व जमलो होतो. मागणी कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने होती. अशावेळेस गुन्हे दाखल कसे होतात? येथे कायद्याचे राज्य शिल्लक आहे की नाही, हाच प्रश्न आहे. मणिपूर आणि बिहारसारखी महाराष्ट्राची स्थिती झाली असल्याची टीका त्यांनी केली.

वसंत देशमुखांना पुणे जिह्यातून घेतले ताब्यात

जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे वसंत देशमुख यांना पुणे जिह्यातून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्यापासून वसंत देशमुख फरार होते. भाजपचे डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या धांदरफळ येथील सभेत वसंत देशमुख यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या अश्लाघ्य टीकेवरून राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तेव्हापासून वसंत देशमुख हे फरार होते. आज अहिल्यानगर पोलिसांनी पुणे जिह्यातून त्यांना ताब्यात घेतले आहे.