महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून प्रचंड संघर्ष सुरू असून राज्यातील 16 हून अधिक विधानसभा मतदारसंघांत महायुतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. महायुतीत भाजपकडून मित्र पक्षांवर दबाव आणून जागा वाटपात स्वत:ला जास्त जागा घेतल्याची चर्चा आहे. जस जसा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ येतोय व उमेदवाऱ्या जाहीर होत आहे महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील रविवारी एक ट्विट करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
अकोला जिल्ह्यातील एकुण पाच विधान सभा मतदारसंघापैकी ४ जागा भाजपा ला तर १ जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली. मी स्वत: जिल्ह्यात चार वर्ष प्रामाणिकपणे काम केले. पक्ष वाढीसाठी तीन जागेची मागणी केली मात्र एकही जागा पक्षाला न मिळणे हे वेदनादायी आहे.@SunilTatkare
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 27, 2024
अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा आहेत. त्यातील चार जागा भाजप लढवत असून एक जागा मिंधे गट लढवत आहे. अजित पवार गटाला या जिल्ह्यात एकही जागा न मिळाल्याने अमोल मिटकरी नाराज असून त्यांनी जाहीर पणे ट्विटरवरून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
”अकोला जिल्ह्यातील एकुण पाच विधान सभा मतदारसंघापैकी 4 जागा भाजपला तर 1 जागा शिंदे गटाला सुटली. मी स्वत: जिल्ह्यात चार वर्ष प्रामाणिकपणे काम केले. पक्ष वाढीसाठी तीन जागेची मागणी केली मात्र एकही जागा पक्षाला न मिळणे हे वेदनादायी आहे”, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
या ठिकाणी टेन्शन
– कोथरूडमध्ये भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे, पण तेथे भाजपचेच अमोल बालवडकर यांनी बंडखोरी केली आहे.
– मावळात भाजपचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. तेथे भाजपच्या बाळा भेगडे आणि त्यांच्या समर्थकांनी राजीनामे देत राष्ट्रवादीच्या बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
– सोलापूर शहर उत्तरमधून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
– चंदगड-आजरा मतदारसंघात विद्यमान आमदार राजेश पाटील यांना अजित पवार पक्षाची उमेदवारी दिली आहे. तेथे भाजपचे शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली आहे.
– भाजपने नाशिक पश्चिममधून आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी दिल्याने तेथे भाजप नेत्यांनी बंडखोरी करत मनसेत प्रवेश करून उमेदवारी घेतली.
– दिंडोरीत विद्यमान आमदार नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असून, तेथे शिंदे गटाचे धनराज महाले यांनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला.
– बीडमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.