वांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरी ही देशाच्या ढासळत्या पायाभूत सुविधांचे ताजे उदाहरण आहे, राहुल गांधी यांची टीका

रविवारी सकाळी वांद्रे रेल्वे स्थानकावर वांद्रे- गोरखपूर एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांची एकच गर्दी झाली. त्यामुळे वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक 1 वर चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यावरून सध्या रेल्वे मंत्रालयावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ”उद्‌घाटन आणि प्रचार हा तेव्हाच चांगले असते जेव्हा त्यामागचा मुख्य हेतू जनतेच्या सेवेचा असतो. सार्वजनिक मालमत्ता असलेले पूल, प्लॅटफॉर्म किंवा पुतळे हे देखभाल न केल्याने व दुर्लक्षामुळे जर लोकांना जीव गमवावा लागत असेल तर ही गंभीर बाब आहे. मुंबईच्या वांद्रे टर्मिनस स्थानकावर नुकतीच झालेली चेंगराचेंगरी ही देशाच्या ढासळत्या पायाभूत सुविधांचे ताजे उदाहरण आहे . गेल्या वर्षी जूनमध्ये बालासोर रेल्वे दुर्घटनेत 300 जणांना जीव गमवावा लागला होता, मात्र पीडितांना नुकसान भरपाई देण्याऐवजी भाजप सरकारने त्यांना दीर्घ कायदेशीर लढाईत अडकवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा अवघ्या 9 महिन्यांत कोसळतो, याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, महाराजांचा पुतळा उभारण्यामागचा हेतू फक्त प्रसिद्धीचा होता- शिवाजी महाराजांबद्दल ना आदर होता ना सार्वजनिक सुरक्षेची काळजी होती. आज देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची गरज आहे जी गरिबांच्या स्थानिक गरजांची देखील काळजी घेते – सोयिस्कर प्रवास, योग्य व्यवसाय आणि सुरक्षा लोकांना मिळेल अशा सुविधांची गरज आहगे. हिंदुस्थान सक्षम आहे, समर्थ आहे – आपल्याला लोकांची सेवा आहे आणि देशाच्या विकासाचा भक्कम पाया रचणारी प्रभावी आणि पारदर्शक व्यवस्था हवी आहे, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

रविवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान वांद्रे टर्मिनसच्या फलाट 1 वर ही घटना घडली. घटनेनंतर काही होतेय ते कोणालाच समजत नसल्याने गोंधळ वाढला आणि सैरभैर होऊन लोक पळत होते. वांद्रे गोरखपूर एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी सकाळी 3 वाजेपासून प्रवासी फलाटावर आले होता. ही ट्रेन सकाळी 5.10 वाजता सुटते. गाडी फलाटात आल्यानंतर ही घटना घडली. सकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी एक्सप्रेस फटालावर आली. त्यानंतर गाडीत चढण्यासाठी अचानक गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. अनेकांकडे आरक्षण नसल्याने जनरल डब्यातून प्रवास करत गावाला जाण्याचा अनेकांचा प्रयत्न होता. त्यामुळे डब्यात चढताना चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.