गुजरातपाठोपाठ लखनऊमधील हॉटेल्सना धमकी, ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या देत खंडणीची मागणी

गुजरातपाठोपाठ उत्तर प्रदेशातील लखनऊमधील 10 प्रमुख हॉटेल्सना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. रविवारी ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. आरोपीने 55,000 डॉलर (रु. 4,624,288) खंडणीची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न केल्यास हॉटेल्समध्ये स्फोट होईल, असे ई-मेलमध्ये म्हटले आहे.

लखनऊमधील मॅरियट, साराका, पिकाडली, कम्फर्ट व्हिस्टा, फॉर्च्यून, लेमन ट्री, क्लार्क अवध, कासा, दयाल गेटवे आणि सिल्व्हेट या हॉटेल्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.

तुमच्या हॉटेलच्या मैदानावर काळ्या पिशव्यांमध्ये बॉम्ब लपवले आहेत. मला 55,000 डॉलर (रु. 4,624,288) हवे आहेत, नाहीतर मी स्फोटकांचा स्फोट करेन आणि सर्वत्र रक्तपात घडवेन. बॉम्ब निकामी करण्याचा कोणताही प्रयत्न केला तर त्यांचा स्फोट होईल, असे ई-मेलमध्ये लिहिण्यात आले होते.

मेल प्राप्त होताच हॉटेल व्यवस्थापनाने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ हॉटेल्सकडे धाव घेत तपास सुरू केला.