प्रवास बसचा, तिकिटदर विमानासारखे; रेल्वेत जागा मिळेना, ट्रॅव्हल्सचे तिकीट दर परवडेना

दिवाळीमुळे रेल्वे आणि एसटीचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे खासगी बसचालक फायदा घेत आहेत. परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे एसटी तिकीट दराच्या तुलनेत 50 टक्के अधिक दर घेण्याची मुभा खासगी बसचालकांना आहे. प्रत्यक्षात मात्र दुप्पट, तिप्पट दर आकारले जात आहेत. त्यामुळे दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.

नोकरी व कामानिमित्त पुण्यात राज्य आणि राज्याबाहेरील वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवाळी जसजशी जवळ येत आहे, तसतशी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत आहे. याच संधीचा फायदा खासगी बसचालक घेत आहेत. दि. 28 पासून दिवाळी सुरू होत आहे. या काळात पुण्याहून सुटणाऱ्या सुमारे 900 खासगी बसेस 26 ऑक्टोबरपर्यंत आधीच बुक केल्या गेल्या आहेत. दिवाळीनंतरच्या परतीच्या सहलींसाठी परिस्थिती विशेषतः भयानक आहे. जेथे भाडे जवळपास तिप्पट असू शकते. पुणे शहरासह उपनगरांत अनेक ठिकाणी खासगी बसचालकांचे थांबे आहेत. दिवाळीच्या काळात या ठिकाणावरून हजारो प्रवासी जातात. गर्दी, उपलब्ध जागांची संख्या मर्यादित असल्याने खासगी बसच्या तिकीट दरात विमानाच्या दराएवढी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीमुळे गावी जाण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो. परंतु, सध्या रेल्वेच्या काही नियमित आणि विशेष गाड्या फुल्ल आहेत. त्यात एसटीची कमतरता असल्याने प्रवाशांचा ओढा खासगी वाहनांकडे वळला आहे. याच संधीचा फायदा घेऊन खासगी वाहतूकदारांकडून
प्रवाशांकडून लूट सुरू आहे. सध्या पुण्यातून दररोज जवळपास 900 ट्रॅव्हल्स जातात. परंतु, या लुटीला कोण आळा घालणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ठोस कारवाईचा अभाव…
पुण्याहून सुटणाऱ्या अनेक खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे दर तुलनेत अधिक आहेत. खान्देश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह तळकोकणात जाणाऱ्या गाड्यांचे तिकीट दर 2 ते 3 हजार रुपये आहेत. एसटी भाड्याच्या दीडपटपेक्षा अधिक भाडे खासगी ट्रॅव्हल्सचे नसावे, असा नियम असला, तरी ठोस कारवाईचा अभाव असल्याने ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरावर नियंत्रण राहत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

रेल्वेला तोबा गर्दी
पुण्यात बाहेरील राज्यांतून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेचा तिकीट दर कमी असल्याने सर्वसामान्य नागरिक रेल्वेला पसंती देतात. तसेच लांब पल्ल्याचा प्रवास आरामशीरपणे करता येतो. यामुळे प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. परिणामी, रेल्वेच्या प्रमुख गाड्या या बाराही महिने ‘फुल्ल’ धावतात. त्यामुळे ज्यांना प्रवास करायचा आहे, त्यांनी आगाऊ तिकीट बुक केल्याशिवाय पर्याय नाही. वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांची संख्या वाढविण्यात येत आहे.