…म्हणे, भुजबळांनी सर्वांनाच टोपी घातली

<<<बाबासाहेब गायकवाड>>>

कोणत्या वेळेला कसे बदलायचे हे राजकारणी माणसाकडून शिकावे म्हणतात. योग्य वेळ साधून मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नेहमीची मफलर बाजूला सारली. तिच्या जागी महायुतीचा गमछा घातला, डोक्यावर गांधी टोपी चढविली अन् कुर्ता पायजमा परिधान केला. अस्सल ग्रामीण पेहराव करून आपला वेगळा रंग दाखविला. त्यांच्या राजकीय प्रवासाचा संबंध जोडून त्यांनी सर्वांनाच टोपी घातली, असे आरोप त्यांच्यावर होत आहेत. ईडी कोठडीत असताना आणि तेथून बाहेर आल्यानंतरही भुजबळांनी गळ्यात मफलर घालण्याची अन् वयोमानानुसार पांढरी झालेली दाढी कायम ठेवण्याची स्टाईलच करून घेतली होती. अनेक साथीदार, विश्वासू पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द शरद पवार यांनी सांगूनही त्यांनी ही स्टाईल बदलली नव्हती. निष्कारण ईडी कोठडीत टाकून भाजपाने त्यांचा राजकीय सूड घेतला, त्याच्या निषेधाचे ते निदर्शक होते, असे म्हटले जायचे.

पेहराव बदलून त्यांनी ग्रामीण भागातील जनतेशी समरस असल्याचा भास निर्माण केला, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. शुभ कामाला डोक्यावर टोपी असावी म्हणून त्यांनी स्वतःच्या डोक्यावर टोपी घातली असावी. प्रमुख उपस्थितांच्या डोक्यावरही टोपी होती. या सर्वांकडूनच आपले स्वतःचे सर्वकाही शुभ व्हावे, असाही हेतू त्यामागे असावा. पण, त्यांच्या या वेगळ्या रूपाला अन् सकारात्मक हेतूला काही लोक नजर लावून त्यांच्याविषयी अशुभ चिंतीत आहेत, अशी भावना त्यांच्या समर्थकांची आहे.

छगन भुजबळांनी मूळ शिवसेना सोडली, सत्तेसाठी त्यांना सूचलेले ते शहाणपण होते. शरद पवार यांच्या निष्ठेपोटी काँग्रेस सोडून ते मूळ राष्ट्रवादीत स्थापनेपासूनच गेले. ईडी कोठडीतून सुटल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारच्या शपथविधीवेळी त्यांना मोजक्या मंत्र्यांबरोबर मंत्रीपदाचा मान देण्यात आला होता. मला मंत्री करून शरद पवार यांनी राजकीय जीवदान दिले, अशी भावना त्यांनी तेव्हा व्यक्त केली होती.

राजकीय अनुभवाच्या अन् भाजपाने दिलेल्या त्रासाच्या तुलनेत जरा कमी महत्त्वाचे असे अन्न, नागरी पुरवठा खाते दिले ही त्यांची कुरकुर नव्हे खंत होती. मोठ्या पवारांची साथ सोडून ते अजित पवारांबरोबर गेले, ते स्वार्थासाठी गेले असे म्हटले जाते. तसे असतेच तर त्यांनी पूर्वीचेच कमी महत्त्वाचे खाते का स्वीकारले असते. काहीतरी अपरिहार्यता असल्यानेच ते अजित पवार गटात गेले असावे, असा दावा केला जातो.

तिकडे काय सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी जातो, असे सांगून मी अजित पवार गटातून महायुतीत थेट मंत्रीपदाची शपथ घेवून टाकली. हे प्रसारमाध्यमांच्या मुलाखतीत सांगून आपण शरद पवार यांच्याशी खोटे बोललो याची प्रामाणिक कबुली त्यांनी देऊन टाकली, महायुतीत सामील होण्याच्या अपरिहार्यतेला त्यांनी दुजोराच दिला. आपल्या निष्ठावंत स्वभावावर शंका घेणे संयुक्तिक नाही, हा खुलासा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

महायुतीतून शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरुद्ध त्यांचे पुतणे समीर हे नांदगावमधून लढत आहेत. समीर यांनी पन्नाशी पार केली आहे, किती दिवस त्यांनी माझ्याकडे विचारणा करायची, त्यांचे निर्णय त्यांनी घ्यावे, राजकारणात कुणाशी कसे लढायचे, कुणाशी कधी जुळवून घ्यायचे हे त्यांना कळते, असेही भुजबळांनी स्पष्ट केले. यातही त्यांनी पुतण्याच्या अपक्ष लढण्याचे समर्थन केले असा ठपका ठेवण्यात आला. सर्वच पुतणे चुलत्यांचे ऐकतात असे होत नाही.

राजकारणातल्या सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच असतो, असे सांगून पुतणे फुटीचे सर्व दाखलेही दिले. ही त्यांची खेळी असल्याचे बोलले जात आहे. येवल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासह प्रमुख उपस्थितांच्या डोक्यावर टोपी होती. आता यावर छगन भुजबळांच्या राजकीय पार्श्वभूमीचे दाखले घेऊन त्यांनी सर्वांनाच टोपी घातली, असा आरोप होत आहे. हे अन्याय आणि विषमता निर्माण करणारे आहे, असे शल्य त्यांना होणे स्वाभाविकच आहे.

मतदार जगृतीसाठी फ्लॅशमॉब

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी शनिवारी नरिमन पॉईंट येथे फ्लॅशमॉबच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यात आले. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला होता.