महाराष्ट्र लोकसभा आयोगाने अखेर मुंबई महानगरपालिकेसाठी सात सहाय्यक आयुक्तांची शिफारस केल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभारीच्या माध्यमातून कारभार हाकणाऱ्या वॉर्डना आता हक्काचा सहाय्यक आयुक्त मिळणार आहे. त्यामुळे वॉर्डमधील कामांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला असून यासाठी सात उत्तीर्ण तथा निवड झालेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दिनेश पल्लेवाड (खुला प्रवर्ग), नितीन शुक्ला (खुला प्रवर्ग), अरुण क्षीरसागर (ओबीसी- सर्वसाधारण), उज्ज्वल इंगोले (ओबीसी- सर्वसाधारण), योगिता कोल्हे (ओबीसी महिला प्रवर्ग), कुंदन वळवी (अनुसूचित जमाती), योगेश देसाई (दिव्यांग प्रवर्ग) अशी सहाय्यक आयुक्त पदासाठी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. या सर्वांची नियुक्ती सहाय्यक आयुक्तपदी करून घेतल्यानंतर प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरच या सर्वांना विविध विभागांच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती केली जाणार आहे.