कर्जतमधील गद्दार पोपटाचा डोळा फोडा!, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर माथेरानमधील शिवसैनिक जोमाने लागले कामाला

सत्ता आणि पैशासाठी आईसमान शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपलेल्या बेइमानांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी निश्चयाची वज्रमूठ बांधा आणि एकच लक्ष्य ठेवत कर्जतमधील गद्दार पोपटाचा राजकीय डोळा फोडा, असा आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. हा आदेश शिरसावंद्य मानून ‘मातोश्री’ निवासस्थानातून परतलेल्या माथेरानमधील शेकडो शिवसैनिकांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कर्जत-खालापूरमधील निष्ठावंत उमेदवार नितीन सावंत यांच्या विजयाचा गुलाल उधळण्याचा एकमुखी निर्धार केला.

कर्जत-खालापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत, मिंधे गटाचे महेंद्र थोरवे आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. दरम्यान माथेरान नगर परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत, शहरप्रमुख कुलदीप जाधव तसेच अन्य माजी नगरसेवकांसह शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘मातोश्री’वरील या बैठकीसाठी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी कर्जत-खालापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून विजयाची ही परंपरा कायम ठेवा. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मिंध्यांच्या पोपटाचा पराभव करून त्याचा राजकीय डोळा फोडा असे आदेशच दिले. त्यामुळे चैतन्य संचारलेल्या माथेरानमधील शिवसैनिकांनी विचारांची आणि निष्ठेच्या तेजस्वी मशालीने नितीन सावंत यांनाच विजयी करू, असा निर्धार केला.

कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकेल. आम्ही सर्व कडवट शिवसैनिक असून उद्धव साहेबांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य आहे, असे माथेरान नगर परिषदेचे माजी गटनेते प्रसाद सावंत म्हणाले.

‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावून उद्धव साहेबांनी आम्हाला कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेने निष्ठावंत उमेदवार दिला आहे, तुम्हीदेखील माथेरानचे निष्ठावंत शिवसैनिक आहात, असा विश्वास आमच्याप्रति दाखवला असून आम्ही नितीन सावंत यांना विक्रमी मतांनी विजयी करू, माथेरान शहरप्रमुख कुलदीप जाधव म्हणाले.