भंडारदरा येथील हॉटेल, रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी खंडपीठात जनहित याचिका

भंडारदरा स्थित शेंडी व मुरशेत येथील बेकायदेशीर हॉटेल, रिसॉर्टच्या बांधकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात धाव घेण्यात आली आहे. येथील हॉटेल, रिसॉर्टमुळे बांधकामामुळे पर्यावरणाचा र्‍हास होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बेकायदेशीर हॉटेल्स व रिसॉर्टवर कार्यवाही करण्याची विनंती जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या जनहित याचिकेवर 22 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

भारत सरकारने अधिसुचना काढुन कळसुबाई व हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य संवर्धनसाठी इको सेन्सिटिव्ह झोन जाहिर केला आहे. सदर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये शेंडी व मुरशेत या गावाचे क्षेत्र अंतर्भुत केले आहे. भारत सरकारच्या अधिसुचनेनुसार या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्यास प्रतिबंध आहे. असे असताना सुध्दा शेंडी व मुरशेत येथे भंडारदरा डॅमजवळ अशोक यशवंतराव भांगरे (मयत) यांचे वारस अमित भांगरे, अमरनाथ भिडे, प्रताप शेळके यांनी बेकायदेशिरपणे यश रिसॉर्ट, एस.पी. व्हॅली रिसॉर्ट, आनंदवन रिसॉर्ट नावाने पक्के हॉटेल बांधल्याचे याचिकेत म्हटले आहे.

यामुळे या अभयारण्यातील वन्यजीव प्राणी, पक्षी यांच्या जिवास धोका निर्माण केला आहे. सदर हॉटेल्स, रिसॉर्टस यांना उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, सहाय्यक नगर रचनाकार यांनी बेकायदेशिररित्या अकृषी परवाने व बांधकाम परवाने मंजुर केली आहेत. बेकायदेशीर हॉटेल्स, रिसॉर्टस बांधकामामुळे पर्यावरणाचा र्‍हास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे श्रीनिवास रेणुकादास यांनी अ‍ॅड. तुकाराम व्यंजने व अ‍ॅड. पंकज गायकवाड यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली आहे. संबंधित हॉटेल मालक, ज्यांनी परवानगी दिली त्या अधिकार्‍यांविरुद्ध जनहित याचिका दाखल करून बेकायदेशीर हॉटेल्स, रिसॉर्टवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे.