भाजप नेते वसंत देशमुख यांनी खालच्या शब्दांत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर टीका केली होती. सर्व स्तरातून देशमुख यांचा निषेध होत आहे. आता जयश्री थोरात यांचे वडिल आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भाजपवर टीका केली आहे. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत देशमुख यांनी अशी भाषा वापरली, विखे पाटील हे ढोंगी आहेत असे थोरात म्हणाले.
माध्यमांशी बोलताना थोरात बोलले की, लोकशाहीने प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. गेल्या पाच वर्षात राजकारणाची पातळी खाली घसरलेली आहे. सुजय विखे यांनी दोन तीन सभेत खालच्या पातळीवर भाषण केले होता. त्याचाच परिणाम विखे यांचा कार्यकर्त्याने हीन आणि गलिच्छ शब्दांत टीका केली. अशा शब्दांत टीका केली की ते सांगताही येणार नाही. अजूनही या प्रकरणातला गुन्हेगार पकडला गेलेला नाही. एवढे गंभीर विधान केल्यानंतर अशा गुन्हेगाराला अटक करण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. राज्यात सरकार आणि प्रशासन राहिलंय की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. हा फक्त जयश्री यांचा प्रश्न नाही तर प्रत्येक महिलेचा हा अपमान आहे. मतांसाठी एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला महिलांवर अशी टीका करायची. प्रत्येकाच्या घरात लेकी बाळी आहेत. वसंत देशमुख यांनी जेव्हा हे विधान केले तेव्हा स्टेजवरचे नेते टाळ्या वाजवत होते. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. सुजय विखे ढोंगी आहेत असेही थोरात म्हणाले.