> डॉ. मुकुंद कुळे
शहरात दिवाळी सणाचा जो झगमगाट दिसतो, तो ग्रामीण भागात नसतो. कारण त्यांच्यासाठी हा सण म्हणजे केवळ दिव्यांचा उत्सव नसतो, तर तो एक प्रकृती उत्सव असतो. शेतीचा पावसाळी हंगाम संपलेला असतो अणि दारापुढचं खळं शेतात पिकलेल्या धनधान्याने भरून वाहत असतं. नव्याने घरात आलेल्या या धान्याधुन्याची आणि ते ज्यांच्यामुळे आलं, त्या गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा सण साजरा केला जातो. त्यामुळेच नागर संस्कृतीत दिवाळीला फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असते, तेव्हा अनागर संस्कृतीत मात्र हे धान्य पिकवणारा निसर्ग, गुरं आणि ज्याच्या काळात भूमिपुत्र अतिशय सुखासीन आयुष्य जगत होता, त्या बळिराजाची पूजा बांधली जाते.
लोकरहाटीतली दिवाळी अशी कृषिसंस्कृती जागवणारी असते. शेतशिवाराची भरभराट होवो म्हणणारी, घरात गुरा-ढोरांची समृद्धी येवो म्हणणारी आणि बळीराजाच्या राज्याचं दान मागणारी. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव तर आहेच. अंधाराचा नाश करून घरी-दारी प्रकाशाची बरसात करणारा सण. शहरात वसुबारसपासून दिव्यांच्या या उत्सवाला सुरुवात होते. नंतर धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवस, या सणाची रंगत उत्तरोत्तर वाढवत नेतात. मात्र, शहरात या सणाचा जो झगमगाट दिसतो, तो ग्रामीण भागात नसतो. कारण त्यांच्यासाठी हा सण म्हणजे केवळ दिव्यांचा उत्सव नसतो, तर तो एक प्रकृती उत्सव असतो. शेतीचा पावसाळी हंगाम संपलेला असतो अणि दारापुढचं खळं शेतात पिकलेल्या धनधान्याने भरून वाहत असतं. नव्याने घरात आलेल्या या धान्याधुन्याची आणि ते ज्यांच्यामुळे आलं, त्या गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा सण साजरा केला जातो. त्यामुळेच नागर संस्कृतीत दिवाळीला फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असते. तेव्हा अनागर संस्कृतीत मात्र हे धान्य पिकवणारा निसर्ग, गुरं आणि ज्याच्या काळात भूमिपुत्र अतिशय सुखासीन आयुष्य जगत होता, त्या बळिराजाची पूजा बांधली जाते. गुराखी-शेतकरी किंवा आदिवासी कोणीही असो, गावगाडय़ात आणि वाडय़ा-पाडय़ांत दिवाळीचे हे पाच दिवस निव्वळ प्रकृती उत्सव साजरा होत असतो.
गुराखी समाज धनत्रयोदशीपासून लव्हाळ्याची दिवटी विणायला सुरुवात करतात. लव्हाळी म्हणजे चांगलं पुरुषभर उंचीचं वाढलेलं गवत असतं. या गवताच्या हिरव्या काडय़ांपासून प्रत्येक घरातील गुराखी एक सुबक गवती दीपमाळ विणतो. रोज दीपमाळेचा एक थर याप्रमाणे पाच दिवसांत तो पाच थर विणतो. रोज नव्याने विणलेल्या दीपमाळेच्या खणात दिवा ठेवून त्या दिव्याने गुराखीराजा रोज आपल्या गुरांना ओवाळतो.
मराठवाड्यातील गुराखी-शेतकरी समाजातील महिला दिवाळीच्या या पाच दिवसांत रोज शेणाच्या गवळणी तयार करतात. शेणापासून रोज बनवण्यात येणाऱ्या गवळणींच्या पुतळ्यांची रोज पूजा करून त्यांना दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. पाडव्याच्या दिवशी मात्र पाच पांडवांसाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. दिवाळीचे हे पाचही दिवस गुरांचा मान राखण्यासाठी म्हणून त्यांचीही रोज पूजा केली जाते. तसंच पाचही दिवस दह्याने गुरांच्या पुढच्या पायावर चंद्र आणि मागच्या पायावर सूर्य काढण्याची या समाजात प्रथा आहे. यामागे चंद्र-सूर्य असे तोपर्यंत हे गोधन आपल्या घरी कायम राहो, हा हेतू असतो, तर पाचव्या दिवशी शेणाने केलेले पांडव सुकले, की नंतर ते शेतात नेऊन जाळले जातात. या वेळी पांडव जाळताना निर्माण होणाऱ्या धगीवर दूध तापवलं जातं आणि ते मुद्दाम उतूही जाऊ दिलं जातं. त्यामागचा प्रतीकात्मक हेतू हा, की शेतात येणारं पीकही असंच भरभरून येऊ दे आणि ओसंडून वाहू दे.
अनागर संस्कृतीत प्रत्येक समाज आपापली जगण्याची स्वतंत्र शैली राखून असतो. ती रोजच्या व्यवहारातच असते असं नाही; तर सण-उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीतही असते. दिवाळी हा कृषी उत्सव असल्यामुळे लोकरहाटीतील बहुतेक समाज या सणाला आपल्याला उपयोगी पडणाऱया पशूला विशेष मान देतात. गुराखी आणि आदिवासी दिवाळीत गुरांना आणि बकऱ्यांचं औक्षण करतात, तर धनगर समाजाची दिवाळी ही खास त्यांच्या मेंढय़ांसाठीच असते. धनगर समाजात पाडव्याच्या दिवशी मेंढा आणि मेंढीचं प्रतीकात्मक लग्न लावण्याची पद्धत आहे. वधू-वरांना सजवावं, तसं मेंढीच्या गळ्यात हळकुंडाचा गोफ तर मेंढ्यांच्या गळ्यात पान-सुपारीचा गोफ बांधतात. त्यानंतर खंडोबा-बिरोबाची गाणी म्हणत मेंढा-मेंढीचं दणक्यात लग्न लावलं जातं.
कोकणातील दिवाळी संदर्भातील काही पद्धती आता हळूहळू लुप्त पावत चालल्या आहेत. पूर्वी कोकणात ‘परीटाचा दिवा’ प्रसिद्ध होता. बांबूच्या खोबणीत लामणदिवा लावून परीट स्त्री, दिवाळीत गावातील प्रत्येक घरी जायची आणि घरातील कर्त्या पुरुषाला ओवाळायची. परीट स्त्रीकडून ओवाळून घेणं हे पूर्वी अतिशय भाग्याचं किंवा शुभलक्षण मानलं जायचं. ही ओवाळणी झाली की घरचा यजमान त्या परीट स्त्रीला फराळ आणि दक्षिणा द्यायचा. अर्थात गावातील कर्त्या पुरुषांना परीट स्त्रीच का ओवाळायची, यामागचं कारण कळत नाही. कदाचित परीट हा वस्त्र-प्रावरणं धुणारा समाज असल्यामुळे, एकप्रकारे तो सगळ्यांना शुचिर्भूत करतो असा पारंपरिक समज असावा आणि त्यातून ही प्रथा आकाराला आली असावी.
शहरांतूनही मूळ प्रथा-परंपरा जिवंत राहिलेल्या दिसतात. त्यामुळेच तर कृषिसंस्कृतीत महत्त्वाचा मानला जाणारा दिवाळीत साजरा केला जाणारा बळीराजाचा हा उत्सव केवळ अनागर संस्कृतीतच नाही, तर तो नागर संस्कृतीतही पाहायला मिळतो. उदाहरणार्थ मूळ मुंबईकर मानला जाणारा पाठारे प्रभू हा समाज नागर संस्कृतीत पक्का रुळलेला, परंतु तरीही या समाजात दिवाळीत बळीराजाचे गोडवे गाण्याची प्राचीन परंपरा अजून टिकून आहे. विशेष म्हणजे इतर कोणत्याही समाजात न आढळणारी बळीराजाची अश्वारूढ मूर्ती केवळ याच समाजातील प्रत्येक घरात पाहायला मिळते.
बाराव्या शतकात गुजरातमधल्या अहिनलवाडहून दुसऱया बिंबराज यादव याच्याबरोबर तत्कालीन अपरांत प्रांतात म्हणजे आजच्या मुंबईत आलेला पाठारे प्रभू हा समाजही एक आद्य मुंबईकर समाज मानला जातो. मूळचा लढवय्या समाज असल्यामुळे पेशव्यांपासून ब्रिटिशांपर्यंत सर्वच काळात हा समाज राजदरबारी कामात आघाडीवर राहिला. परिणामी, मूळ मुंबईकर असलेल्या या समाजाने आगामी काळात आपली उन्नती करून घेतली. राहणीमानातही आधुनिक संस्कृती स्वीकारली; परंतु सण-उत्सव साजरे करण्यातली परंपरा या समाजाने सोडली नाही. म्हणूनच दिवाळीतील सगळ्या परंपरा हा समाज आजही मोठ्या उत्साहाने जपतो आणि त्यांची दिवाळीची खासियत म्हणजे आठविंदा आणि बळीराजाची मूर्ती. पैकी आठविंदा म्हणजे मुख्य दिवाळीच्या एक आठवडा आधी अष्टमीपासून सलग आठ दिवस काढल्या जाणाऱया वैशिष्टय़पूर्ण रांगोळ्या. या रांगोळ्यांना नावंही वेगवेगळी आहेत. अष्टमीला काढली जाणारी रांगोळी म्हणजे आसन्या. त्यानंतर बोंडल्या, तेंडल्या, खांबल्या, देवळ्या, नांगऱ्या अशी रांगोळ्यांना नावं आहेत. तर धनत्रयोदशीच्या दिवशी पोखरणीची रांगोळी काढतात. पोखरण म्हणजे पुष्करणी. पूर्वी पाण्यासाठी घराच्या मागच्या आवारातच विहीर किंवा पोखरण खणली जायची. कालौघात ही पोखरण नष्ट झाली, तरी ती रांगोळी रुपाने उरलीच.
पाठारे प्रभू समाजाची अजून एक परंपरा म्हणजे बळीराजाचा मान राखणारी आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी पहाटे उठून बळीराजाच्या मूर्तीची चौरंगावर प्रतिष्ठापना करण्यात येते. नंतर त्या मूर्तीची यथासांग पूजा केली जाते. त्या आधी घरातील गृहिणी घरातल्या कचऱ्याची पूजा करून बाहेर टाकते. मग ती घरात थाळी बडवत जाते नि म्हणते- ‘इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो!’ कारण बळीराजाच्या काळात सर्व प्रजा सुखी आणि समृद्ध होती.
पाठारे प्रभू हा समाज मूळचा गुजरातमधला क्षत्रिय समाज. परिस्थितीवश त्याला शेती करावी लागली असेल वा गुरं राखावी लागली असतील. त्यातूनच बळिराजाची पूजा करण्याचा हा संस्कार या समाजात रुजला असला पाहिजे.
लोकरहाटीने आपली कृषिपरंपरा दिवाळीच्या सणात अजून टिकवून ठेवली आहे. नागर संस्कृतीच्या अपामणामुळे आता गावगाडय़ातही शहराप्रमाणेच दिवाळी साजरी होऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या किंवा एकूणच भारतातील एखाद्या खेड्यात किंवा आदिवासी पाड्यावर गेलात, तर तिथे तुम्हाला दिवाळीला प्रकृतीचा, म्हणजे कृषिसंस्कृतीचा जागर मांडलेलाच दिसेल!