किस्से आणि बरंच काही – सगळं काही ठरलेलं असतं…

>> धनंजय साठे

रिअॅलिटी शो पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग असतो जो अत्यंत मन लावून, भावनिकरित्या गुंतून हे शोज पाहात असतो. मात्र या शोजमधील अनेक गोष्टी या नियोजित असतात. वाहिनीचा टीआरपी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी केल्या गेलेल्या या गोष्टी म्हणजे प्रेक्षकांची फसवणूकच आहे. मात्र प्रेक्षकांनीही यात फार न गुंतता केवळ खेळ म्हणूनच या शोजकडे पाहावे.

रिअॅलिटी शोज किती रिअल असतात? मी स्वतच्या डोळ्याने पाहिलेलं दृश्य. माझा मित्र आणि त्याची बहीण एका घरात राहणाऱया स्पर्धकांचा शो बघत होते. बघताना एकमेकांशी कचाकचा भांडत होते. कारण मित्राच्या आवडीचा कलाकार स्पर्धक त्याच्या बहिणीला अजिबात आवडत नव्हती आणि त्यामुळे ते दोघे इतके वेडय़ासारखे भांडत होते की मला हसू आवरेनासं झालं होतं. पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण या अशा प्रकारच्या शोजमुळे असंख्य घरांमधलं वातावरण विनाकारण दूषित झालं आहे.

आपण जे टीव्ही क्रीनवर बघतो त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या वागण्या-बोलण्यावर आणि आपल्या स्वभावावरही होत असतो. हे सत्य आहे. कुणाला पटेल तर कुणाला नाही. पण हेच अटल सत्य आहे. मोठय़ा घरात राहणाऱया शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतलेल्या काहीजणांनी ही गोष्ट स्पष्टपणे मान्य केली आहे की हा शो पूर्णपणे क्रिप्टेड असतो. सगळं काही नियोजित असतं. टीआरपीचं गणित वाढवण्यासाठी शोमध्ये कोणी कोणाशी भांडायचं, कोणाचं कोणाशी लफडं असलं पाहिजे, शिवीगाळ करण्यापासून मारामारीपर्यंत किती मसाला भरभरून टाकला गेला पाहिजे, हे सगळं काही ठरलेलं असतं. जसजसा शो पुढे सरकत जातो तसतसा निर्मिती टीमचा अभ्यास सुरु होतो. पाहणाऱयांना कोणता स्पर्धक आवडतोय. कोणाला कमी मतं पडत आहेत आणि मुख्य म्हणजे कोण जिंकला तर त्या निर्मात्यांना व चॅनेलला त्याचा कसा आणि किती फायदा होऊ शकतो इत्यादी. प्रेक्षकांना उगीचंच वाटतं की जो फायनल जिंकतो तो अमाप श्रीमंत होतो वगैरे. होत असतीलही… पण अहो, इथे देवाणघेवाण याचा वेगळाच खेळ सुरु झालेला असतो.

शेवटी प्रत्येकाला आपला फायदाच बघायचा असतो. असंच सगळ्या चॅनल्सवर चालू असतं. वेगवेगळ्या गाण्यांच्या शोजमध्येही असंच चालतं. नुकतीच एक मुलाखत पाहण्यात आली. एके काळी सिंगिंग रिअॅलिटी शोजची परीक्षक आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका सुनिधी चौहानने मुलाखतीत नमूद केलं होतं की तिने परीक्षकाची खुर्ची, त्याबरोबर येणारं मानधन आणि प्रसिद्धी याच कारणासाठी सोडली होती. तिला व अन्य परीक्षकांना स्पष्टपणे सांगण्यात यायचं की अमुक एका गायकाबद्दल सकारात्मक मत द्या. मग एखादा गायक अप्रतिम गायला तर त्याला परीक्षकांनी उभं राहून टाळ्या मारून कौतुक केलेलं असलं तरीही जर तो वाहिनीचा लाडका नसेल तर त्या स्पर्धकांना स्पर्धेतून बाहेर जावंच लागतं. त्या गायकाला/गायिकेलासुध्दा तसं सांगण्यात आलेलं असतं. त्यामुळे उगाचंच त्यांच्या गाण्यात नसलेल्या त्रुटी काढून, मते कमी आली असल्याचं सांगून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. सुनिधी चौहानला हे पटलं नाही. त्यामुळे ती बाजूला झाली. ज्यांना तत्वांशी काही देणंघेणं नसतं ते चालवतात असले शो.

डान्स रिअॅलिटी शोमध्येही हीच कथा आहे. स्पर्धकांच्या वेदना/व्यथेच्या कथा नसल्या तर त्या बनवल्या जातात. मग कोणाची गरीबी, कोणाची अजून काही व्यथा असेल तर ती वस्तुस्थितीपेक्षाही भयानक बनवून अतिशयोक्तीचा भरपूर मसाला पेरून भोळ्याभाबडय़ा प्रेक्षकांसमोर वाढला जातो. प्रेक्षक बिचारे भोळे. ताटात वाढलेलं सगळ संपवायचं ही लहानपणापासूनची शिकवण.

तरुणाईचा प्रवासी या अजून एका शोमध्ये पण असंच काहीसं होत असतं. सगळं काही पूर्व नियोजित किंवा टीआरपीच्या मागणीनुसार त्या-त्या वेळेला निर्णय घेऊन बदलणं. गाण्यांच्या शोमध्ये एडिट लेव्हलवर काय घडलंय ते आपल्याला एपिसोड बघताना कळत नाही. आज युटय़ूबवर याचे अनेक व्हिडीओज उपलब्ध आहेत ज्यात हे सगळं काही नमूद आहे. निदान हिंदीमध्ये तरी ही प्रथा पाळली जाते. कुणालाही कमी कुवतीचे गायक, नृत्य कलाकार किंवा इतर कलाकार नको असतात. पण आज वस्तुस्थिती तशी नाही ना! सगळेच कसे बेस्ट असू शकतील? खरं चित्र प्रेक्षकांना कधी दिसणार? म्हणजे किती गंमत आहे की धोक्याचे खेळाडू सारख्या जोखीमीचे खेळ खेळल्या जाणाऱया शोमध्ये एक स्पर्धक होती. ती मगरीबरोबर लढली होती तिसऱया एपिसोडमध्ये. त्यामुळे तिच्या मानेवर पट्टी लावावी लागली होती. आत्ता हा तिसरा एपिसोड कदाचित शूट करताना आधी केला गेल्यामुळे ती जखमेवर बांधलेली पट्टी व त्या स्पर्धकाच्या मानेवरील खुणा पहिल्या एपिसोडपासूनच दिसत होत्या. म्हणजेच शूट करताना आधी तिसरा एपिसोड शूट झाला असणार आणि त्यानंतर पहिला आणि मग दुसरा झाला असणार. टीव्ही मालिकांमध्येही असंच पाहायला मिळतं. कारण शूटिंग हे लोकेशन आणि सीनच्या गरजेप्रमाणे शूट केलं जातं. पान नंबर 1, मग 2, मग 3 असं कधीच होत नाही. मालिका करताना एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये चित्रीकरण करायचं असेल तर उदाहरणार्थ त्या ठरलेल्या दिवशी जितकी मॉलची दृश्ये असतील तेवढी सगळी त्या दिवसात चित्रित करून घेतली जातात. म्हणजे मग सारखं सारखं मॉलमध्ये जाउढन एक-एक दृश्य चित्रित करण्याची गरज राहात नाही.

एकूण काय तर जी प्रेक्षक मंडळी शोमुळे इतरांसोबत वाद घालत बसतात, भांडणं करतात. ती त्यांनी करू नये कारण सगळं काही आधीच ठरलेलं असतं आणि नसेल ठरलं तर ते वेळप्रसंगी बदलताही येतं. एखादा खेळ आपल्यासमोर चालला असेल तर त्याला जितकं द्यायचं तेवढंच महत्त्व द्यावं असं माझं स्पष्ट मत आहे. ‘करोडपती’मध्ये हजार, लाख, कोटी जिंकलेला स्पर्धक त्याच्या वाटय़ाला आलेले पैसे आपल्याला देणार नसतो. मग आपला बीपी का वाढवा आणि त्रास करून घ्या. काहीच गरज नाही ना? पूर्वी असं नव्हतं. बऱयापैकी पारदर्शकता होती. पण आर्थिक उलाढाल वाढल्यापासून हे चित्र बदललं आहे. तर मला इतकंच म्हणायचं की सगळं काही ठरलेलं असतं…

[email protected]