>> संजय मोने
ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे नुकतेच निधन झाले. बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण विनोदबुद्धीचं देणं लाभलेल्या काही भाग्यवंतांपैकी ते एक होते असे म्हणायला हवे. अतुल परचुरे यांचे जाणे रसिकांसाठी धक्कादायक आहेच, सोबत त्यांच्या मित्र गोतावळ्यासाठीही त्यांची अनुपस्थिती अधिक खोलवर जाणवणारी आहे. या मित्र गोतावळ्यातील या लेखक मित्राचे हे हृद्य मनोगत.
गेल्या वर्षी याच सदरात मी अतुल परचुरे या माझ्या श्रेष्ठ कलाकार मित्रावर ‘साहेब’ या मथळ्यात एक लेख लिहिला होता. आज एक वर्षानंतर त्या मथळ्यात बदल करून ‘कै. साहेब’ असा लेख लिहायला लागेल असं वाटलं नव्हतं मला. आपल्याला अनेकदा झोपेत असताना स्वप्नं पडतात. त्यातली काही सुखावह असतात, तर काही दुःख पर्यवसायीही असतात. अशी अनेक स्वप्नं मी माझ्या आयुष्यात पाहिली आहेत. पण साहेबांच्या बाबतीत असं कुठलंही स्वप्न मला पडलेलं नाही. बऱयाचदा तो स्वप्नात येऊन त्याच्या विशिष्ट भाषेत आम्हाला ‘झाडत’ असायचा आणि मी दचकून जागा व्हायचो. पण आज एक स्वप्न नाही, तर सत्य सामोरं आलं आणि त्याला मला तोंड द्यायला जागा उरली नाही. हा लेख मी संगणकावर लिहितो आहे म्हणून अन्यथा ‘कै. साहेब’ असा लेख हातांनी लिहायची ताकद ना माझ्या हातात आहे ना लेखणीत.
साधारण 1983-84 पासून कै.साहेब आमच्या संपर्कात आले. (आमच्या म्हणजे आम्ही पाच-सहा जण रुपारेलचे विद्यार्थी. शैक्षणिक हिशेबात दोन-चार वर्षं मागेपुढे. रुपारेल कॉलेजचे कॅन्टीन हे एकेकाळी मुक्त दरवाजा असलेले ठिकाण होते. जिथे सतरा-अठरा वर्षांचे अधिकृत विद्यार्थी असायचे आणि त्याहून जास्त पार चाळिशीला पोहोचलेले माजी विद्यार्थीही असायचे. तर त्यात आम्ही असायचो.) त्याआधी आम्ही कॉलेजात अधिकृत विद्यार्थी होतो तेव्हा कै. साहेब शाळकरी होते. बालमोहन शाळा. तेव्हा त्यांच्या एका बालनाटय़ाचे जोरदार प्रयोग चालू होते. दादर भागात ते आणि वामन हरी पेठे यांचे आशीष पेठे हे अत्यंत लोकप्रिय होते. कशी आणि का किंवा कधी ठाऊक नाही, पण साहेबांशी आमची ओळख झाली आणि ते जे आमच्यात वयाने थोडे लहान असून कसे सामील झाले आणि एखाद्या लोणच्यासारखे तत्काळ मुरले ते आठवत नाही. त्याही काळात त्यांचा लक्षात येणारा गुण म्हणजे अत्यंत प्रगल्भ आणि थोडीशी (थोडीशी नाही तर) प्रखर बुद्धिमत्ता. जोडीला भरपूर वाचन. तेव्हा कै.साहेब ‘टिळक आणि आगरकर’ या कै.विश्राम बेडेकर लिखित आणि दिग्दर्शित नाटकात आगरकरांच्या पुतण्याची भूमिका करायचे. कै. विश्राम बेडेकर म्हणजे दिग्दर्शकातला वडवानल. त्यांनी कै. साहेबांची भूमिकेसाठी निवड केली यातच त्यांची योग्यता दिसून येत होती.
साल 1984 आम्ही आमच्या संस्थेसाठी राज्य नाटय़ स्पर्धेत राजीव नाईक लिखित ‘अनाहत’ नावाच्या नाटकाचे सादरीकरण केलं होतं. त्याच्या तालमी बरेच दिवस सुरू होत्या. त्यामुळे कै.साहेब आमच्या अधिकाधिक जवळ आले. वयातलं अंतर त्यांनी आपल्या गुणवत्तेने आणि विनोदाच्या विलक्षण अशा गोष्टीने पार मिटवून टाकलं. साहेब आमच्यातले झाले. त्याच सुमारास आम्ही सगळे अभिनय ही आपली कारकीर्द करायची या निर्णयावर आलो होतो. कै.साहेबांना तथाकथित कलाकारांना असणारी रूपसंपदा लाभली नव्हती. म्हणून त्यांनी बँकेत नोकरी करायचा निर्णय घेतला. पण दुसरीकडून त्यांना विविध भूमिकांसाठी विचारणा होत होती.
कै.साहेबांचा स्वभाव सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आणि त्यातून मार्ग काढायचा असा होता. त्यामुळे त्याला लाभलेले वरेरकर नावाचे अधिकारी किंवा राऊळ नावाचे सहकारी बँकेत त्याची अनुपस्थिती जाणवू द्यायचे नाहीत. आमच्या सगळ्यांची त्या दोन्ही बँकांतल्या माणसांशी ओळख होती. राऊळ आणि वरेरकर यांनी कै.साहेबांना बरीच वर्षं शाखेत सांभाळून घेतलं. कै.साहेब कायम त्यांच्याबद्दल ऋणी होते. काही काळानंतर साहेबांना मालिका मिळाल्या. नाटकं होतीच, पण जाहिरातींचा नवा मार्ग उघडला गेला. त्यांच्या बाळसेदार शरीराला आणि निर्व्याज हसण्याला. शिवाय अभिनय तर होताच. या सगळ्याला लोकांची मान्यता मिळाली आणि आजपर्यंत त्यांनी शेकडो जाहिरातपट केले. ‘नातीगोती’ नावाच्या नाटकात त्यांना गतिमंद मुलाचं काम करायची संधी मिळाली आणि त्यांनी त्या भूमिकेचं सोनं केलं. त्या सुमारास भूमिकेचा अभ्यास करायचा तर तशा प्रकारच्या माणसांचं अवलोकन वगैरे करायचं असा एक खुळचट प्रकार नुकताच रुळत होता. सध्या त्याचा अतिरेक झालाय. पण कै.साहेबांनी केवळ आपल्या वाचन आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता यावर ती भूमिका साकारली होती. शिवाय भूमिकेत शिरून सगळं विसरून अभिनय करायचा वगैरे गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता. कोणीतरी त्यांना एकदा छेडलं होतं. “ही भूमिका करताना तुम्ही कोणाला जाऊन भेटला होतात का किंवा कुठल्या डॉक्टरांशी काही चर्चा केली होती का?’’
अंगावर बर्फाचं पाणी पडलं तर आपण कसे शहारू, तसा शहारा देत कै.साहेब म्हणाले, “नाही हो! असं बघून काही होत नाही. कारण बघितलं तरी ते दाखवता आलं पाहिजे ना? कल्पना करा. एखादी बाई सती गेली आणि तिच्या मुलीनं ते सगळं पाहिलं तर पुढे जाऊन ती एका सतीची भूमिका करू शकेल का?’’
समोरचा माणूस टीकाकार म्हणवत होता तो आता कोकण रेल्वेत चिक्की विकतो. आमचा पाच-सहा जणांचा संच आपापल्या वाटेने चालला होता. बरेवाईट दिवस येत होते, जात होते. आम्ही आता जवळपास रोजच एकमेकांना भेटत होतो. त्याला प्रमुख कारण म्हणजे शिवाजी पार्कची सकाळ आणि कधी कधी संध्याकाळही. तिथे आमचा जवळपास पंधरा ते सतरा लोकांचा एक मस्त संच जमला होता. सकाळचा तासभर म्हणजे एक गोल्डन अवर होता. त्या सुमारास कै.साहेब आमच्यातले सगळ्यात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व झाले होते. गुणवत्तेत ते काकणभर सरस होतेच, पण लोक आवर्जून त्यांच्याशी बोलायला थांबायचे. आपल्या व्यक्तिमत्त्वाला अजिबात न शोभणाऱया भूमिका उत्तम पद्धतीने साकार करणे ही साहेबांची एव्हाना खासियत झाली होती. इतक्यातच त्यांना एक विलक्षण भूमिका साकार करायची संधी मिळाली आणि ती म्हणजे पु.ल.देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या व्यक्तिचरित्रात्मक पुस्तकावर कै.रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या त्याच नावाच्या नाटकात भाऊ ऊर्फ पु.ल.देशपांडे यांची. कै.साहेब त्यात हुबेहूब पु.ल.साकार करायचे. स्वत पुलंनी त्याचं मनापासून कौतुक केलं. त्या दिवसानंतर कै.साहेबांना त्यांच्या घरी केव्हाही प्रवेश करण्याची सन्मानिका प्राप्त झाली. कै.साहेबांचं लग्न झालं तेव्हा पुलंचा खास संदेश त्यांना आला होता. मिळवलेल्या नावाचा, कीर्तीचा आणि संपत्तीचा त्यांनी कधीही गैरवापर केला नाही. उलट ‘उत्तम वेव्हारे जोडावी धनसंपदा’ या उक्तीवर ते चालत राहिले. आई-वडील, पत्नी आणि मुलगी यांच्यात ते गुंतून जात. आपली सगळी कर्तव्यं त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. अनेक पुरस्कार आणि सन्मान त्यांच्याकडे हळूवार चालत आली. तेव्हाही ‘उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको’ हेच त्यांचं जगण्याचं ध्येय होतं.
आज साहेब ‘कै.साहेब’ झाले आणि आमच्यातून पुढे निघून गेले. माणूस जातोच. प्रत्येक जण जाणार आहे. तो गेल्याने कोणाची ना कोणाची हानी होतेच. काळ सगळ्या गोष्टींवर मलम आहेच. पण दुःख एकच आहे. आता ती बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण विनोदबुद्धी पुन्हा आम्हाला कधीच अनुभवायला मिळणार नाही… कै.साहेब!