>> अनिल हर्डीकर
जेआरडी टाटा हे आदर्शवत व्यक्तिमत्त्व. त्यांच्या टेल्को म्हणजे टाटा मोटर्समध्ये टेल्को शॉप फ्लोअरवर काम करणारी पहिली महिला ठरल्या त्या सुधा मूर्ती. जेआरडी टाटा यांच्याशी झालेली त्यांची पहिली भेट त्यांना टाटांच्या सामाजिक बांधीलकीचा, त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा वसा देणारी ठरली.
एकदा तिन्हीसांजेला ती तिचा नवरा मूर्ती तिला घेण्यासाठी येण्याची वाट पाहत ऑफिससमोर उभी होती. तिला आश्चर्य वाटले की, घरी जाण्यासाठी गाडीत बसण्याऐवजी जेआरडी ती एकटी अंधारात उभी असलेली पाहून तिच्या शेजारी उभे राहिले होते. तिला सुचेना, काय प्रतिक्रिया द्यावी.
‘‘ऑफिसची वेळ संपली तरी तू इथे का उभी आहेस?’’ त्यांनी विचारलं. ती म्हणाली, “सर, मी नवऱयाची वाट पाहते आहे.’’
जेआरडी म्हणाले, “अंधार पडत आहे आणि आजूबाजूला कोणीही नाही. तुझा नवरा येईपर्यंत मी तुझ्या बरोबर थांबेन.’’
ती अस्वस्थ झाली. थोडय़ा वेळानं तिचा नवरा आला तशी ती धावत पुढे गेली. जेआरडींनी ओरडून सांगितले, “तुझ्या नवऱयाला सांग की, बायकोला पुन्हा कधीही वाट पाहायला लावू नकोस.’’ या प्रसंगातील ती म्हणजे सुधा मूर्ती.
मात्र हा त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा नाही. ही त्या दोघांची दुसरी भेट होती. नुकतंच माधव जोशी यांचं ‘टाटा-एक विश्वास’ पुस्तक वाचनात आले. त्यात उभयतांच्या पहिल्या भेटीचा किस्सादेखील वाचायला मिळाला. तरुण, हुशार, धाडसी आणि आदर्शवादी सुधा कुलकर्णी बंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मध्ये (IISC) संगणक शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला होती. आयुष्य मौजमजा आणि आनंदाने भरलेले होते.1974 चा एप्रिल महिना. पदव्युत्तर विभागात ती एकुलती एक मुलगी होती आणि लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती. इतर मुली विज्ञानाच्या विविध विभागांत संशोधन करत होत्या. कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट करण्यासाठी परदेशात जाण्यासाठी तिला अमेरिकेतील विद्यापीठांनी शिष्यवृत्ती देऊ केली होती. तिने हिंदुस्थानात नोकरी करण्याचा कधी विचारही केला नव्हता. एके दिवशी लेक्चर हॉल कॉम्प्लेक्समधून वसतिगृहात जाताना तिला नोटीस बोर्डवर एक जाहिरात दिसली. प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी टेल्कोकडून (आता टाटा मोटर्स) ही नोकरीसाठी अर्ज मागवणारी नोटीस होती.
कंपनीला तरुण, हुशार, मेहनती आणि उत्कृष्ट शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले अभियंते इत्यादींची गरज असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. एक छोटी तळटीप होती, ती म्हणजे ‘महिला उमेदवारांना अर्ज करण्याची गरज नाही.’ हे वाचून ती खूप अस्वस्थ झाली. आयुष्यात प्रथमच ती लिंगभेद होत असलेला पाहत होती.
नोकरी करण्यास ती उत्सुक नसली तरी त्याकडे एक आव्हान म्हणून पाहिले. तिने शिक्षणात खूप चांगली कामगिरी केली होती. तिच्या बहुतेक पुरुष सहकाऱयांपेक्षा ती उजवी होती. वास्तविक पाहता जीवनात यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक नैपुण्य पुरेसे नसते हे तेव्हा तिला माहीत नव्हते.
तिने जेआरडींना उद्देशून पोस्टकार्ड लिहिले- ‘टाटा हे नेहमीच महान आणि अग्रगण्य राहिले आहेत. लोखंड आणि पोलाद, रसायने, कापड आणि लोकोमोटिव्ह यांसारखे मूलभूत, पायाभूत, सुविधा उद्योग त्यांनीच हिंदुस्थानात सुरू केले. 1900 सालापासून त्यांनी हिंदुस्थानात उच्च शिक्षणासाठी ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ची स्थापना केली. सुदैवाने मी तिथेच शिकते, पण टेल्कोसारखी कंपनी लिंगभेद कसा करत आहे याचे मला आश्चर्य वाटते.’
पत्र पोस्टात टाकले आणि ती ते विसरूनही गेली. त्यानंतर 10 दिवसांनी तिला टेलिग्राम आला की, कंपनीच्या खर्चाने टेल्कोच्या पुणे केंद्रात मुलाखतीला हजर राहावे लागेल. ती थक्क झाली. मुलाखतीसाठी ती टेल्कोच्या पिंपरी कार्यालयात गेली. पॅनेलमध्ये चक्क सहा जण होते आणि तेव्हा तिच्या लक्षात आले की, ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही. ‘‘जेआरडीला पत्र लिहिणारी ही मुलगी आहे,’’ खोलीत शिरताच तिला कोणीतरी कुजबुजताना ऐकू आले. तोपर्यंत तिला नोकरी मिळणार नाही याची खात्री पटली होती.
पॅनेलने तिला तांत्रिक प्रश्न विचारले आणि तिने त्या सर्वांची उत्तरे दिली. तेव्हा एक वृद्ध गृहस्थ प्रेमळ स्वरात तिला म्हणाले, “महिला उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही, असे आम्ही का म्हटले माहीत आहे का? याचे कारण आम्ही कधीही शॉप फ्लोअरवर एकाही महिलेला कामावर घेतलेले नाही. हे कॉलेज नसून कारखाना आहे. शिक्षणाचा विचार केला जातो तेव्हा आपण प्रथम क्रमांकावर आहातच. त्याचे कौतुक आहेच, पण तुमच्यासारख्या मुलींनी संशोधन प्रयोगशाळांमध्ये काम केले पाहिजे.’’
अखेर एका प्रदीर्घ मुलाखतीनंतर ती यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. स्कॉलरशिपवर अमेरिकेला जायचे की टेल्कोमध्ये काम करायचे या द्विधा मनस्थितीत ती होती, पण तिच्या वडिलांनी तिला सांगितले की, तिने जेआरडींना पत्र लिहून नोकरी मागितल्यामुळे आता टेल्कोमध्ये काम करण्याची नैतिक जबाबदारी तिच्यावर आहे. ती पुण्यात टेल्कोमध्ये रुजू झाली. टेल्कोमध्ये रुजू झाल्यानंतरच तिला जेआरडी कोण आहेत हे कळले. हिंदुस्थानी उद्योगाचा बेताज बादशहा! ती घाबरली होती, पण मुंबईला बदली होईपर्यंत तिला जेआरडींना भेटायला मिळाले नाही. एक दिवस टेल्कोचे चेअरमन श्री. मुळगावकर यांना काही अहवाल दाखवायचे होते. बॉम्बे हाऊसच्या पहिल्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयात ती असताना अचानक जेआरडी आत आले. तिने जेआरडींना प्रथमच तिथे पाहिले. पोस्टकार्डचा प्रसंग आठवून ती खूप अस्वस्थ होती. मुळगावकरांनी तिची छान ओळख करून दिली, “जेह, ही तरुणी इंजिनीअर आहे आणि तीही पोस्ट-ग्रॅज्युएट. टेल्को शॉप फ्लोअरवर काम करणारी ती पहिली महिला आहे.’’ जेआरडींनी तिच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, “आपल्या देशात मुली इंजिनीअरिंगला प्रवेश घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे.’’
“तुझं नाव काय?’’
“टेल्कोमध्ये रुजू झाले तेव्हा मी सुधा कुलकर्णी होते सर. आता सुधा मूर्ती आहे.’’ ते हसले. आज सुधा मूर्तींचे कार्य पाहिले की, त्यांची सामाजिक बांधीलकी पाहून त्यांच्यावर टाटांच्या विचारांचा, संस्कारांचा पगडा लक्षात आल्याशिवाय राहत नाही.