>> दिव्या नेरुरकर-सौदागर
‘अहंकार’ किंवा ‘मीपणा’ हा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दडलेला असतोच. कधी तो सुप्त रूपात असतो, तर कधी दुसऱयाला जाणवण्याइतपत. कधी नावाला असतो, तर कधी प्रचंड प्रमाणात. आमच्या मानसशास्त्राrय भाषेत ‘अहंकारा’ला समजून घ्यायचं झालं तर ज्या व्यक्ती अहंकारी असतात, त्यांना मुळात स्वतची ओळख कमी असते किंवा त्या स्वतच्या कमतरतेला इतरांपासून तसंच स्वतपासून ‘अजाणतेपणी’ लपवून ठेवतात. स्वतची विचारधारा विणत जातात आणि त्याप्रमाणे इतरांशी वागतात व शेवटी एकटय़ा पडतात.
‘‘माझी मुलगी आता वाया जात चालली आहे. काहीतरी करा’’ अशी विनवणी श्रद्धाताईंनी फोनवर केली आणि त्यांच्या मुलीला, आर्याला (दोघींची नावे बदलली आहेत) घेऊन त्या तडक दुसऱया दिवशी क्लिनिकमध्ये आल्या. आल्या आल्या त्यांनी आर्याच्या वर्तनाचा पाढा वाचायला सुरुवात केली. त्यांच्या मते आर्या अत्यंत बेशिस्त आणि उर्मट होत चालली होती. ती कोणाचाही आदर करत नव्हती की स्वतच्या अभ्यासाकडेही लक्ष देत नव्हती. “आर्याचे वडील आज तुम्हाला भेटायला नाही येऊ शकले, पण पुढच्या वेळी ते आमच्या सोबत नक्की येतील.’’ असे श्रद्धाताईंनी म्हणताच “मग पुढच्या वेळीच आलो असतो ना आपण. मला एकटीला का घेऊन आलीस?’’ आर्याने असे म्हणत तोंड उघडले. “का घेऊन आलीस म्हणजे? तू अशी कायम मला बोल लावत बसणार असशील तर मी काय करू? कायम माझा इन्सल्ट करतेस तू.’’ श्रद्धाताई तिच्यावर कडाडल्या. “मॉम, आता यात इन्सल्ट काय होतोय तुझा? मी क्लीअर बोलतेय. मला तुझ्या बरोबर नाही वाटत यावंसं. पप्पाबरोबर वाटतं. तू खूप बोअर आहेस’’ असं म्हणत आर्याने तोंड दुसरीकडे वळवले.
“पाहिलंत मॅडम? हे असं असतं हिचं. फक्त वादावादी करायची आणि मग फुरंगुटून बसायचं. माझ्याशी बोलताना तोंड उघडेल ते फक्त भांडण्यासाठीच. काही समजवायला गेले तर मी लेक्चर देते असं तिला वाटतं.’’ श्रद्धाताई हताशपणे बोलल्या. “बाबांची लाडकी आहे वाटतं’’ असं त्यांना सांगताच त्या काही म्हणणार होत्या. तेवढय़ात आर्याने पटकन सांगितलं, “पप्पा जरा सेन्सिबल तरी आहे. तो समजून घेतो मला आणि मॉम मी बरोबर करीन माझं. माझ्या लाईफमध्ये मी काय करावं आणि कसं वागावं हे माझं मला ठरवू दे. प्लीज!’’ काहीशा उर्मट आवाजातच आर्याने तिच्या आईचं तोंड बंद केलं.
त्या दोघींच्या एकमेकींबरोबर असलेल्या संवादातून त्यांचा एकमेकींबद्दल असलेला बेबनाव स्पष्ट जाणवत होता.सत्रामध्ये एकेकीशी स्वतंत्रपणे बोलणं महत्त्वाचं होतं. त्याप्रमाणे आधी आर्याशी बोलण्यास सुरुवात झाली. आर्या एकटीच असल्याने खुलली. “मी तुम्हाला रूड वाटत असेन मॅम, पण मी तितकीशी वाईट नाही.’’ असं बोलून तिने तिची बाजू मांडायला सुरुवात केली. “मी आता नववीत आहे. आमची शाळा ही मार्कांच्या बाबतीत थोडी कडक आहे. त्यामुळे शाळेत आम्हाला आठवीपासून जास्त अभ्यास असतो आणि पॅरेंट्स मीटिंग्सही भरपूर असतात. आता मला अभ्यास जास्त वेळ करायला कंटाळा येतो. त्यामुळे आई खूप वैतागते आणि ओरडायला लागते. मग पप्पा मध्ये पडतो दोघींच्याही आणि मला सांभाळून घेतो. तेही तिला आवडत नाही.’’ साळसूदपणे तिने आईवरच्या रागाचं कारण सांगितलं. ही तिची बाजू ‘तिच्या मते’ तिने व्यवस्थित सांगितली होती आणि तिच्या आईवरच्या उद्धटपणाचंही ‘समर्थन’ केलं.
आता श्रद्धाताईंची पाळी होती. त्यांनी त्यांची बाजू मांडायला सुरुवात केली, जी ‘खरी’ होती. आर्या ही त्यांच्या घरातील शेंडेफळ. पहिल्यापासून लाडात वाढलेली होती. तिला एक मोठा भाऊही होता, जो कॉलेजला होता. त्यांच्या घरी तिचे आजोबाही राहायला होते. त्यांच्यासाठी आर्या म्हणजे जीव की प्राण होती. त्यांनी आर्याला कधी आळसावून टाकलं ते समजलं नाही, पण श्रद्धाताईंच्या हे हळूहळू लक्षात आलं. जसं त्यांच्या लक्षात आलं तसं त्यांनी आर्याच्या बाबतीत कडक पावलं उचलायला सुरुवात केली. “ही मुलगी सकाळी 10 वाजता उठते आणि 11.30 ला कसंतरी आवरून शाळेत पळते. टीव्हीशिवाय जेवत नाही. अभ्यास जरासा करून कंटाळते आणि आताच्या परीक्षेत दोन विषयांत नापास झाली आहे, तरी तिला ओरडू नको म्हणायला माझे पती आणि सासरे आहेत. तिच्या समोर मला सासरे ओरडतात आणि हे खिल्ली उडवतात. मी फक्त 10वी पास आहे याची सतत जाणीव मला सारखी करून देतात. आर्याने याचा फायदा घेतलाय.’’
आर्याची केस ही वरवर पाहता सोपी असली तरी गुंतागुंतीची होती. तिच्या आढय़तेखोर स्वभावाला जसा घरच्यांचा अति लाडावलेपणा, पालकांकडून मिळणारे परस्परविरोधी संदेश कारणीभूत होते तसेच तिचा स्वतबद्दल असलेला न्यूनगंड आणि अहंकारही कारणीभूत ठरत होता. याच अहंकारी स्वभावाला लहानापासून खतपाणी मिळत गेले होते. ज्यामुळे आता तिला समुपदेशनाची गरज तिच्या पालकांना वाटली होती. कारण ती फक्त श्रद्धाताईच नव्हे, तर तिच्या आजोबांचाही अपमान करायला मागेपुढे पाहत नव्हती. भावाशीसुद्धा त्याच आडमुठेपणाने वागत होती.
आर्याचं विश्व फक्त तिच्या घरापुरतंच किंवा तिच्या कुटुंबापुरतं सीमित नव्हतं, तर ती शाळा आणि तिच्या सोसायटीतील मुलामुलींमध्येही मिसळत होती. ‘इतर मुलं-मुली आणि ती स्वत’ अशी तुलना ती स्वाभाविकपणे करत होती. त्यात ती ज्या काही गोष्टींमध्ये मागे पडत होती त्या ती अहंकारामुळे मान्य करत नव्हती आणि तिला जमिनीवर आणण्याचे काम जेव्हा तिची आई करत होती तेव्हा ती आर्यासाठी शत्रू ठरली होती.
“माझा इन्सल्ट झालेला नाही आवडत आणि आई तो सगळ्यांसमोर करते.’’ आर्या आता सत्रामध्ये बोलती झाली.
“पण तुझ्यामध्ये चांगला बदल घडावा म्हणून तुझ्याबद्दल बोलते. पण तू तुझ्या चुका कधीच मान्य नाही करत. म्हणून तुला इतरांची उदाहरणं द्यावी लागतात, पण तुझ्यावर उलटाच परिणाम होतोय.’’ श्रद्धाताईंना हे दुःख जाणवत होतं.
‘अहंकार’ किंवा ‘मीपणा’ हे प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दडलेला असतोच. कधी तो सुप्त रूपात असतो, तर कधी दुसऱयाला जाणवण्याइतपत. कधी नावाला असतो, तर कधी प्रचंड प्रमाणात. आमच्या मानसशास्त्राrय भाषेत ‘अहंकारा’ला समजून घ्यायचं झालं तर ज्या व्यक्ती अहंकारी असतात त्यांना मुळात स्वतची ओळख कमी असते किंवा त्या स्वतच्या कमतरतेला इतरांपासून तसंच स्वतपासून ‘अजाणतेपणी’ लपवून ठेवतात. त्या स्वतमधल्या कमतरता इतरांना नजरेस पडू नयेत म्हणून स्वतभोवती `I Am OK, You Are Not OK’ अशी विचारधारा विणत जातात आणि त्याप्रमाणे इतरांशी वागतात. या त्यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती दुखावल्या जातात आणि या व्यक्ती एकट्य़ा पडण्याचा संभव असतो.
“आपण चुकीचे वागतोय, पण मी नाही मान तुकवणार. कारण मी मान तुकवली तर इतर मला अजून कमी समजतील’’ अशा काहीशा अतार्किक विचारांमुळे या व्यक्ती स्वतचे शारीरिक आणि मानसिकरीत्या नुकसान करून घेतात. आता मानसिक पातळीवरील नुकसानीबाबत अधिक स्पष्टपणे बोलायचे झाल्यास या व्यक्तींना प्रचंड राग (जो अतीव दुःखातून आलेला असतो), अपराधीपणा, न्यूनगंड असतो. या सगळ्या भावना त्यांच्यात दीर्घकालीन तणाव उत्पन्न करू शकतात, ज्यायोगे त्यांना मनस्ताप आणि त्याचा शारीरिक पातळीवरसुद्धा परिणाम होऊ शकतो.
ही वृत्ती लहान मुलांमध्ये किंवा पौगंडावस्थेत असलेल्या मुलांमध्येसुद्धा येऊ शकते याचे एक कारण त्यांच्या आजूबाजूला असलेल्या घरातील व्यक्ती जर अहंकारी स्वभावाच्या असतील तर मूल जाणते किंवा अजाणतेपणी त्या व्यक्तीप्रमाणे वागायला सुरुवात करते.
“खरं आहे तुमचं म्हणणं. आर्याचे आजोबा आणि वडील इगोइस्टिक आहेतच, पण त्या दोघांत इतरही चांगले गुण आहेत की! ते ती बघत नाही’’ श्रद्धाताई उद्गारल्या. आता आर्याला ‘गुण नाही, पण वाण लागलेलाच होता’ आणि त्यासाठी तिच्यावर काम सुरू करणंही गरजेचं होतं.
तिच्या वैयक्तिक सत्रांची सुरुवात झाली तीच मुळी ‘व्यक्तिमत्त्व विकासाने.’ ज्यामध्ये तिच्यावर बऱयाचशा मानसशास्त्राrय पद्धती (‘झोहारी विंडो’ पद्धत, जी व्यक्तीच्या कमतरतेवर प्रकाश टाकून त्यावर काम करते), अतार्किक विचारांवर आणि भावनांचे व्यवस्थापन या सगळ्यावर हळूहळू काम करण्यात आले. आर्याने सुरुवातीला सहकार्य दिले नाही, पण जेव्हा तिला शाळेकडून गैरवर्तनाची नोटीस आली तेव्हा तिने सत्रांमध्ये सहकार्य दाखवले. तिच्या वृत्तीमध्ये असलेला कडकपणाचा मुखवटा त्या दिवशी गळून पडला, ज्या दिवशी तिने “मीसुद्धा कमी आहे, पण मला माझ्या आईकडून शाबासकी हवीय’’ हे रडत सांगितले. ती आईच्या कठोर वागण्यामुळे दुखावली गेली होती. तिला आईकडूनही तितकेच लाड हवे होते. श्रद्धाताई आणि आर्याची सत्रे एकत्र घेतली गेली, ज्यामध्ये दोघींमध्ये झालेला तणाव, गैरसमज चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. आर्याला चांगल्या सवयी आत्मसात करता याव्यात म्हणून काही मार्गदर्शक दिनचर्या तिच्या बरोबर आखण्यात आली आणि यात तिच्या आईवडिलांनाही समाविष्ट करण्यात आले.
या सगळ्यामध्ये खुश होता तो आर्याचा दादा. हल्ली ती सत्रांमध्ये त्याच्या बरोबरही येते आणि सत्राच्या शेवटी एक बक्षीस घेऊन जाते.