नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी देण्यासाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या व खंडणी न दिल्यास राज्यभर बदनामी करण्याची धमकी देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. पंतप्रधान कार्यालयातून बोलतो, असे सांगून ही तोतयागिरी सुरू होती.
सहा ऑक्टोबरची ही घटना आहे. या घटनेची नोंद सरकारवाडा पोलिसात करण्यात आली. चौकशीनंतर सर्वेश उर्फ शिवा उर्फ दिनू सुरेंद्र मिश्रा रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश; गौरवनाथ बहादुरसिंग नाथ रा. घडोली, दिल्ली या दोघांना 24 ऑक्टोबरला दिल्लीतून अटक करण्यात आली. नाशिक न्यायालयाने त्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या दोघांनी राज्यात व राज्याबाहेर भाजपच्या नावाने कोणाला फसविले व प्रयत्न केला, याचा तपास सुरू आहे.
पंतप्रधान कार्यालयातून प्रिन्सिपल सेक्रेटरी बोलतोय, असे सांगून नाशिक व इतर ठिकाणची तिकिटे रद्द झाली आहेत, अशा मजकुराचे पत्र एकाने नाशिक मध्यच्या भाजपच्या विद्यमान आमदारांना वाचून दाखविले व उमेदवारी कायम ठेवण्यासाठी खंडणीची मागणी केली.