नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार

न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती खन्ना 11 नोव्हेंबरपासून पदभार स्वीकारणार आहेत. ते देशाचे 51 वे सरन्यायाधीश होणार आहेत. खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. सरन्यायाधीश पदावर त्यांना फक्त सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यांनी अनेक महत्वाच्या खटल्यांचे निकाल दिले आहेत.

खन्ना 1983 मध्ये त्यांनी कायद्याचा सराव सुरू केला होता. ते 2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते. जानेवारी 2019 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते फौजदारी, दिवाणी, कर आणि घटनात्मक कायद्यातील एक उत्तम तज्ञ मानले जातात. खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर करताना असे म्हटले होते की, पीएमएलए कायद्यातील कठोर तरतुदी एखाद्याला खटल्याशिवाय जास्त काळ तुरुंगात ठेवण्याचा आधार असू शकत नाहीत. इलेक्टोरल बाँड्स असंवैधानिक घोषित करणाऱ्या खंडपीठाचे ते सदस्य होते. विवाह चालू राहणे अशक्य असल्यास सर्वोच्च न्यायालय थेट घटस्फोटाचा आदेश देण्यासाठी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करू शकते, असेही त्यांनी नमूद केले होते. यासारखे अनेक महत्त्वाचे निकाल त्यांनी दिले आहेत.