मिंधे सरकारच्या मर्जीतील भ्रष्टाचारी कंत्राटदारांना कामाचे पैसे अॅडव्हान्स मिळाले. मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱया कंत्राटदारांना गेल्या आठ महिन्यांपासून हजारो कोटी रुपयांच्या थकीत रकमेची प्रतीक्षा आहे. ती दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता मावळल्याने राज्यातील सुमारे तीन लाख कंत्राटदारांची दिवाळी अंधारात जाणार आहे. या कंत्राटदारांची उद्या राज्यव्यापी बैठक होत असून त्यामध्ये सरकारविरुद्ध एल्गार पुकारला जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील कंत्राटदारांनी मिंधे सरकारच्या विविध विभागांची हजारो कोटींची विकासकामे केली आहेत. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून त्यांना त्या कामाचे पैसे शासनाकडून मिळालेले नाहीत. ती रक्कम थोडीथोडकी नसून सुमारे 40 हजार कोटी रुपये इतकी आहे. कंत्राटदारांबरोबर विकासक, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनाही त्यांच्या हक्काची देयके शासनाकडून गेली अनेक महिने मिळालेली नाहीत.
मिंधे सरकारने राज्यात अनेक विकासकामे केली. मोठी विकासकामे मर्जीतल्या कंत्राटदारांनाच दिली गेली आणि त्यांची देयकेही वेळेवर देण्यात आली. मात्र वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱया कंत्राटदारांची देयके देण्यात पैसे नसल्याचे कारण सांगून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा कंत्राटदारांचा आरोप आहे.