विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात उमेदवारी अर्ज दाखल होत असले तरी शिवसेनेत प्रवेश करणाऱयांचा ओघ सुरूच आहे. आजही ‘मातोश्री’वर पक्षप्रवेशासाठी रांगा लागल्या होत्या.
धुळय़ाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले आणि हाती भगवा झेंडा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.
मी तुम्हाला उमेदवार देतो, तुम्ही मला आमदार द्या!
धुळय़ामध्ये आता मशालच धगधगणार असे वचन यावेळी गोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, मी तुम्हाला उमेदवार देतो, तुम्ही मला आमदार द्या, असे धुळय़ातील कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, विनायक राऊत, उपनेते अशोक धात्रक आदी उपस्थित होते.