संघर्षानंतर बांगलादेश आफ्रिकेचाच बांगलादेशवर विजय

बुधवारी मेहिदी हसन मिराजच्या संघर्षामुळे बांगलादेशने कसोटीला नाटय़मय वळण दिले होते. मात्र आज चौथ्या दिवशी पॅगिसो रबाडाच्या अचूकतेपुढे बांगलादेशचा उर्वरित डाव 24 धावांतच आटोपला आणि दक्षिण आफ्रिकेने 106 धावांचे माफक आव्हान 3 विकेटच्या मोबदल्यात सहज पार पाडत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सोबत दक्षिण आफ्रिकेने आशिया खंडात तब्बल दहा वर्षे आणि 14 कसोटी सामन्यांनंतर विजय मिळवला.

आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि रबाडाने आपल्या गोलंदाजीचा रणगाडा बांगलादेशी फलंदाजीवर फिरवत सामनाच फिरवला. दिवसाच्या तिसऱयाच चेंडूवर नईमला पायचीत केले आणि नंतर मेहिदी हसन मिराजचे शतक अवघ्या तीन धावा दूर असताना त्याचाही काटा काढला. पहिल्या डावात 202 धावांनी पिछाडीवर असलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव 307 धावांवर संपल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ 106 धावा करायच्या होत्या आणि ते त्यांनी 3 विकेट गमावत केल्या.

14 कसोटींनंतर पहिला विजय
जुलै 2014 साली दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा गॉल कसोटीत 153 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर ते आशिया खंडात 14 कसोटी सामने खेळले, पण त्यांना एकाही सामन्यात विजय नोंदविता आला नाही. त्यातच ते गेल्या नऊ कसोटींत पराभूत झाले होते. अखेर या पराभवांची मालिका मिरपूर कसोटीत आफ्रिकेने मोडीत काढली. गेल्या नऊपैकी पाच कसोटींत हिंदुस्थानविरुद्ध, दोन कसोटींत श्रीलंकेविरुद्ध आणि दोन कसोटींत पाकिस्तानविरुद्ध हरले होते. बांगलादेशमध्ये जात त्यांनी पराभवाची नवमी संपवण्यात यश मिळवले.