पाकिस्तानात ‘निकाह’चा ट्रेंड बदलतोय, मॅरेज अ‍ॅपला तरुणाईची मिळतेय पसंती

प्रातिनिधिक फोटो

पाकिस्तानात 80 टक्क्यांहून अधिक लोक अरेंज मॅरेज करतात. असे असताना गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात मॅरेज अ‍ॅपची चलती आहे. अनेक जण लग्न जुळवणाऱ्या अ‍ॅप्सच्या मदतीने स्वतःसाठी सुयोग्य वधू-वर शोधत आहेत. पाकिस्तानात पारंपरिक पद्धतीने लग्न जमवले जाते. तिथे पारंपरिक मॅचमेकर म्हणजे लग्न जमवण्याचे काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने लग्न जुळवली जातात. ओळखीच्या मुला-मुलीचे स्थळदेखील सुचवले जाते. पाकिस्तानात डेटिंगला मान्यता नाही. अशातच तिथे काही मॅरेज अ‍ॅप्सला पसंती मिळताना दिसत आहे. लाहोरमधील टेक्सटाईल डिझायनर एजा नवाज म्हणाला, मी माझ्या एका सहकाऱ्याला ऑनलाईन पद्धतीने भेटलेल्या जोडीदारासोबत सुखाने संसार करताना बघितले. असेही पारंपरिक ‘आंटी’ पद्धतीने लग्न जुळवली जात आहेतच. मग नव्या पद्धतीने लग्न करायला काय हरकत आहे. एका सर्व्हेनुसार, 80 टक्क्यांहून अधिक पाकिस्तानी कुटुंबाच्या पसंतीनंतर लग्न करतात.

मॅरेज अ‍ॅपवर 12 लाख नोंदणी

पाकिस्तानात मॅरेज आणि डेटिंग अ‍ॅपचा विस्तार होतोय. गेल्या वर्षी लाँच झालेल्या एका अ‍ॅपवर 12 लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे, तर सुमारे 15 हजार लोकांनी लग्न केलेय. अर्थात नवऱ्या मुलीचे प्रोफाईल अत्यंत गोपनीय ठेवले जाते.