महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रशांत यादव यांनी आज वाजत-गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला. आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीने व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आजच्या उपस्थितीमुळे आपण विजयी होऊ, असा विश्वास प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत यादव यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला तर स्वप्ना प्रशांत यादव यांनी आपला डमी उमेदवारी अर्जदेखील दाखल केला. यावेळी चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जि. प.चे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम, काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह, बाळा कदम, तालुकाध्यक्ष विनोद झगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, स्मिता चव्हाण, ॲड नयना पवार, राजू कदम, इब्राहिम दलवाई, महिला पदाधिकारी अंजली कदम व चिपळूण, संगमेश्वरमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी दत्त मंदिर येथे सपत्नीक दर्शन घेऊन प्रशांत यादव यांनी प्रारंभ केला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व ‘प्रशांत यादव आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या.