दलालीच्या खोक्यांचा पुढचा अंक; जळगावमध्ये दीड कोटींची रोकड जप्त, रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना खोकेबाज, गद्दारांकडून अक्षरश: पैशांचा महापूर सुरू झाला आहे. पुणेनजीक खेड-शिवापूर परिसरात पोलिसांनी सोमवारी एका कारमधून पाच कोटी रुपये जप्त घटना ताजी असतानाच आता जळगावमध्येही जवळपास दीड कोटी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या भारकांडे फाट्याजवळ नाकाबंदीदरम्यान एका कारमधून ही रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जळगाव-एरंडोलमध्ये जप्त करण्यात आलेल्या रक्कमेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दलालीच्या खोक्यांचा पुढचा अंक जळगावमधल्या एरंडोलमध्ये दिसला. गद्दार विकत घेतले म्हणून महाराष्ट्र विकत घेता येईल असा कोणाचा समज असेल तर मग त्यांचा अभ्यास कच्चा म्हणावा लागेल. इथे गुजरातची स्टाईल चालणार नाही, महाराष्ट्र-द्रोह्यांना हा महाराष्ट्र गाडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की, असे कॅप्शन या व्हिडीओला रोहित पवार यांनी दिले आहे.

कुठे झाली ही कारवाई?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथकांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. नाकाबंदीदरम्यान कासोदा पोलिसांनी एका कारमधून दीड कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम एका व्यवसायिकाची असल्याची प्राथमिक माहिती पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी दिली. मात्र आचारसंहिता काळात एवढी रक्कम बाळगणे उल्लंघन असून यासंदर्भात निवडणूक आयोगालाही माहिती देण्यात आली आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.