सोयाबीन भरडताना मशीनमध्ये पदर अडकल्याने महिलेचा मृत्यू

सोयाबीन भरडताना सोयाबीन भरडी मशीनच्या एक्सेलमध्ये महिलेच्या साडीचा पदर अडकल्याने महिला पूर्णतः मशीनमध्ये ओढली गेल्याने चिरडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.23) कुसगाव (ता.भोर) येथे घडली. तरुण महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रंजना दत्तात्रय गोरे (वय 35, रा. भोर) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे माहेर भोर-महाड रस्त्यावर धामणदेववाडी येथील आहे. रंजना या घरासमोर सोयाबीन भरडण्याकरिता गेल्या असताना सोयाबीन मशीन चालू झाल्यानंतर रंजना यांचा साडीचा पदर भरडी मशीनमध्ये अडकला.

यावेळी रंजना यांना भरडी मशीनमध्ये ओढले गेले असताना, त्यांच्या शरीराला मोठमोठ्या गंभीर जखमा झाल्या. रंजना यांना मशीनमधून बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी संबंधित महिलेला मृत घोषित केले. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.