दिवाळी जवळ आल्याने आता घराघरात फराळ तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. बाजारातून रेडिमेड फराळ विकत घेणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील अनेक महिला बचत गटांतर्फे दिवाळीचा फराळ तयार करण्याचे काम सुरू आहे. बचत गटाच्या दिवाळी फराळाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आठवडाभरावर दिवाळी आल्याने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. महिला बचतगट व मिठाई दुकानदारांनी दिवाळीत शंकरपाळे, मूग चकली, भाजणी चकली, बेसनलाडू, करंजी, पोहे चिवडा, भाजके पोहे चिवडा, मका चिवडा, पिवळी शेव, लाल शेव, भडंग आदी फराळविक्रीसाठी बाजारात आले आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने यंदा फराळाच्या वस्तूंच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे.
धकाधकीच्या जीवनात व महिलांना नोकरीनिमित्त फराळ करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने तयार फराळाची मागणी वाढली आहे.पूर्वी घरी फराळ तयार करण्यासाठी बोलावले जात असे. आता तयार फराळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे या दिवसांत रोजगार मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बचत गटांबरोबरच शहरातील अनेक महिलाही दिवाळीपुरता हा व्यवसाय घरोघरी करतात आणि त्यांच्याकडील मागणीही दरवर्षी वाढत असल्याचा अनुभव आहे.
विशेषतः घरगुती पद्धतीने तयार केलेल्या चकली, अनारसे अशा पदार्थांना तर मोठी मागणी असते. तयार फराळ खरेदी करण्यालाच प्राधान्य दिले जात असल्यामुळे अनेक महिलांसाठी दिवाळी फराळ तयार करून त्याची विक्री हे व्यवसायाचे नवे दालन खुले झाले आहे. घरगुती पद्धतीने फराळ करण्याचा व्यवसाय जसा जोरात आहे, तसाच केटर्सचाही व्यवसाय या काळात जोरात असतो. विशेषतः ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स असतात, त्यांचे काम दिवाळीच्या आधी महिनाभर सुरू होते आणि दिवाळीच्या पहिल्या, दुसऱ्या दिवसापर्यंत हे काम चालते.
मोठी आर्थिक उलाढाल
शहरात सुमारे 20 हजार महिला बचत गट आहेत. यामधील बहुतांशी बचत गटांमार्फत दिवाळी फराळ बनवून त्याची विक्री केली जाते. महिलांनी स्वतः तयार केलेल्या फराळाच्या वस्तूंना मोठी मागणी असते. यामधून महिला बचत गटांची दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.