Maharashtra Assembly Election 2024 – मिंध्यांच्या यादीत घराणेशाही, नेत्यांची मुले, पत्नी, भावांना उमेदवारी

शिवसेना आणि काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱया मिंधे गटाच्या उमेदवार यादीमध्येच भारतीय जनता पक्षाप्रमाणेच घराणेशाही दिसून आली आहे. नेत्यांची मुले, पत्नी आणि भावांना मिंध्यांनी विधानसभेची उमेदवारी दिली आहे.

मिंधे गटाने आपल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात शिवसेनेशी गद्दारी करणाऱया आमदारांना पुन्हा संधी देतानाच पक्षातील अनेकांच्या कुटुंबीयांनाही तिकीट देण्यात आले आहे.

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजित अडसूळ याला दर्यापूरमधून, लोकसभेवर निवडून गेलेले मिंधे गटाचे संदीपान भुमरे यांचा मुलगा विकास भुमरे याला पैठणमधून तर एरंडोलमधून चिमणराव पाटील यांचा मुलगा अमोल पाटील याला मिंध्यांनी रिंगणात उतरवले आहे. दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना खानापूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले.

शिवसेना सोडून मिंधे गटात सहभागी झाल्यानंतर खासदार बनलेले रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी (पूर्व) या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना मिंध्यांनी उमेदवारी दिली आहे. रत्नागिरीतून मिंधे गटाचे मंत्री उदय सामंत यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर मिंध्यांनी राजापूर मतदारसंघातून त्यांचे भाऊ किरण सामंत यांनाही तिकीट दिले आहे.