केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधी रिंगणात आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत वायनाडमधून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी जाहिर सभेला संबोधित करताना मी तब्बल 35 वर्षे वडील, आई, भाऊ आणि पक्षातील इतर सहकाऱ्यांसाठी प्रचार केला. पहिल्यांदा स्वतःसाठी समर्थन मागत आहे, अशा शब्दांत वायनाडच्या जनतेला भावनिक आवाहन केले. 13 नोव्हेंबर रोजी येथे मतदान होणार आहे.
वायनाडमधील भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार नव्या हरीदास यांनी त्यांना राजकारणात प्रियंका यांच्यापेक्षा अधिक अनुभव आहे, असे वक्तव्य केले होते. त्याला प्रियंका गांधी यांनी उत्तर दिले. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
माझ्यासारखीच बहिणीची काळजी घ्या – राहुल गांधी
मी वायनाडचा अशासकीय प्रतिनिधी असून प्रियंका शासकीय प्रतिनिधी असेल. देशात वायनाड हा एकमेव असा मतदारसंघ आहे ज्याचे प्रतिनिधित्व संसदेत दोन सदस्य करतील असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. जेव्हा मला अधिक गरज होती तेव्हा वायनाडमधील जनतेने माझी काळजी घेतली, माझे संरक्षण केले त्याप्रमाणेच माझ्या बहिणीचीही काळजी घ्या, असे भावनिक आवाहनही राहुल गांधी यांनी यावेळी केले.
माझ्या बहिणीने माझ्या मनगटावर बांधलेली राखी मी तोपर्यंत काढत नाही जोपर्यंत ती तुटत नाही. हेच भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करतो त्याचे प्रतीक आहे. त्यामुळेच बहिणीची काळजी घ्या, असे राहुल गांधी म्हणाले. वायनाडमधील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रियंका संपूर्ण ताकद पणाला लावेल असे आश्वासनही त्यांनी दिले.