Maharashtra Assembly Election 2024 – कमळाबाईला बंडखोरांनी घेरले, मिंध्यांच्या डोक्यावर नाराजांचे तांडव

भाजपकडून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले अनेक नेते उमेदवारीपासून वंचित राहिल्याने नाराज आहेत, तर काहींनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. इचलकरंजी, फुलंब्री, श्रीगोंदा, चांदवड-देवळा, नाशिक, राहुरी, जळगाव, सांगली आदी मतदारसंघांत बंडखोरीची शक्यता निर्माण झाली असून कमळाबाईच्या डोक्याला ताप निर्माण झाला आहे. तर मिंध्यांच्या मतदारसंघातील भाजपच्या घुसखोरीमुळे एकीकडे थयथयाट सुरू असतानाच मिंधे गटाच्या यादीत मर्जीतील नेत्यांना दिलेल्या उमेदवारीमुळे मिंध्यांच्या डोक्यावर नाराजांनी तांडव सुरू केले आहे.

महायुतीचे जागावाटप निश्चित झालेले नसताना कमळाबाईने परस्पर उमेदवारांची यादी जाहीर केल्याने मिंधे आणि अजितदादा गटात धुसफूस सुरू आहे. त्यातच भाजपच्या पहिल्या यादीत उमेदवारीवरून पक्षांतर्गत लाथाळय़ा सुरू झाल्या आहेत. उमेदवारीचा शब्द देऊनही पाळला गेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीतून काहीच साध्य होत नसल्याने भाजपमधील नाराज निष्ठावंतांनी बंडाचे निशाण फडकविण्यास सुरुवात केली आहे.

जळगावात डोकेदुखी

जळगाव शहर भाजपचा बालेकिल्ला आहे. येथे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तिकीट जाहीर झालेले असताना गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय डॉ. अश्विन सोनवणे यांनी बंडाचा झेंडा उचलला आहे. युतीचे चोपडा येथील उमेदवार किशोर पाटील यांच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी अमोल शिंदे यांनीसुद्धा बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपचे संकटमोचक महाजन यांच्यापुढे जळगाव जिह्यातील बंड थोपविण्याचे मोठे आव्हान आहे.

सांगलीत पक्षांतर्गत धुसफुस

आमदार सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगली जिह्यात भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द देऊनही उमेदवारी न मिळाल्याने नाराज शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. जत मतदारसंघातून स्थानिक उमेदवार देण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघात नाराजी

राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षांतर्गत बंडखोरी उफाळून आली आहे. भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र सत्यजित कदम हेदेखील राहुरी मतदारसंघांसाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळेला तिकीट कापल्याने ते नाराज झाले आहेत.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर मिंधे गटाचा दावा

सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर मिंधे गटाने दावा केला आहे. या जागेवर भाजपने कुरघोडी केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दिला आहे.

– फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर होताच रमेश पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.

– इचलकरंजी मतदारसंघ हा मिंधे गटाला मिळावा असा हट्ट स्थानिकांनी धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मतदारसंघाला भरभरून निधी दिला आहे. येथून जिल्हाप्रमुख रवींद्र माने निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांच्या समर्थकांनी मिंध्यांच्या मागे भुणभुण लावली आहे.

– श्रीगोंदा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात भाजपच्या सुवर्णा पाचपुते यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.