विधानसभा लढवू इच्छिणार्या मराठा उमेदवारांची गुरुवारी आंतरवालीत बैठक होणार आहे. मराठा समाजाची ताकद सिद्ध करायची असेल तर एकास एक उमेदवार देणे गरजेचे आहे. त्यामुळे बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात येणार असले तरी गनिमी कावा म्हणून त्यांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. विधानसभा लढवू इच्छिणार्या मराठा उमेदवारांची संख्या प्रचंड मोठी आहे. परंतु राजकीय गणिते बघता एकास एक उमेदवार देणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्या होणार्या बैठकीत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील इच्छुकांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांची नावेही निश्चित करण्यात येतील, परंतु ती जाहीर करण्यात येणार नाहीत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. विरोधकांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम्ही आमचे पत्ते उघडणार असल्याचे ते म्हणाले. इच्छुकांनी अर्ज भरावेत. ऐनवेळी कुणाचा अर्ज ठेवायचा आणि कुणाचा काढायचा हे सांगण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.