कोरोना महामारीचा काळ कधी विसरता येणार नाही. अवघ्या जगात हाहाकार माजला होता. सगळी परिस्थिती वेगळी होती. कधीही न अनुभवलेली. अशा वेळी तज्ञमंडळी आपापल्या परीने मार्गदर्शन करत होती. त्यात एक नाव होते एम्स दिल्लीचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया. डॉ. गुलेरिया यांनी आताही एक मोठा इशारा दिला आहे. हा इशारा प्रदूषणासंदर्भात आहे. कोरोना महामारीमुळे जेवढे मृत्यू झाले, त्यापेक्षा अधिक मृत्यू दरवर्षी प्रदूषणामुळे होतात, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
मेदांताचे इंटरनल मेडिसीन, रेस्पिरेटरी आणि स्लीप मेडिसीनचे अध्यक्ष व एम्स दिल्लीचे माजी संचालक गुलेरिया म्हणाले, हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिटय़ूटच्या 2021 च्या अहवालानुसार, जगात 80 लाख लोक वायू प्रदूषणामुळे मरण पावले आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांपेक्षा हा आकडा अधिक आहे. आपण कोविडच्या बाबत चिंतित होतो. मात्र वायू प्रदूषणाच्या बाबत आपण चिंतित नाही. ‘वर्ल्डोमीटर’च्या माहितीनुसार, जगभरात कोविडमुळे आतापर्यंत 70 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेत सगळ्यात जास्त म्हणजे 12 लाखांहून अधिक मृत्यू झाले.
केवळ हृदय आणि फुप्फुस नव्हे, तर प्रदूषण शरीराच्या कोणत्याही भागावर दुष्परिणाम करू शकते. केमिकल घटकांनी फुप्फुसात शिरकाव केल्याने दीर्घकालीन परिणाम करणारे आजार होऊ शकतात.
डॉ. गुलेरिया यांनी दिलेला इशारा अशा वेळी आलाय ज्या वेळी देशात मान्सून परतीच्या प्रवासात आहे. लवकरच हिवाळा येणार आहे. राजधानी दिल्लीत एअर क्वालिटीचा इंडेक्स 400 पार आताच गेलाय. याचा अर्थ श्वसनाची समस्या धोकादायक झाली असून ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.